कुनार नदी File photo
आंतरराष्ट्रीय

Pakistan Water Crisis | अफगाणिस्तानही पाकचे पाणी अडवणार

कुनार नदीवर धरणे बांधण्याचा तालिबानचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

काबूल; वृत्तसंस्था : पहलगाम हल्ल्याची तत्काळ प्रतिक्रिया म्हणून भारताने सिंधू जल करार मोडीत काढत पाकिस्तानला जाणारे पाणी रोखण्याचा निर्णय घेतला होता. तसाच निर्णय आता अफगाणिस्ताननेही घेतला असून तालिबानशासित अफगाणिस्तान आता पाकिस्तानला जाणारे पाणी अडविण्यासाठी त्यांच्या नद्यांवर धरणे बांधण्याची योजना आखत आहे. कुनार नदीवर शक्य तितक्या लवकर धरण बांधण्याचे आदेश तालिबानचे सर्वोच्च नेते मवलावी हिबतुल्ला अखुंदजादा यांनी दिले आहेत. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात काही दिवसांपासून सशस्त्र संघर्ष पेटलेला असताना आणि शेकडो लोकांचा बळी गेल्यानंतर आता अफगाणिस्तानकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

भारताने मे महिन्यात घेतलेल्या निर्णयाचा पुनरावृत्ती अफगाणिस्तानने केल्याचे यातून दिसून येत आहे. 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने तीन नद्यांमधून पाकिस्तानात वाहून जाणारे पाणी थांबवले. अफगाणिस्तानचे पाणी आणि ऊर्जा मंत्रालयाने सांगितले की, तालिबानचे सर्वोच्च नेते मवलावी हिबतुल्ला अखुंदजादा यांनी कुनार नदीवर शक्य तितक्या लवकर धरणे बांधण्याचे काम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी देशाअंतर्गत कंपन्यांशी करार करा, असेही ते म्हटले आहेत. याबाबतची माहिती मंत्रालयाचे उपममंत्री मुहाजेर फराही यांनी गुरुवारी एक्सवर पोस्ट शेअर करत दिली.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तात लंडनस्थित असलेल्या अफगाणी पत्रकार सामी युसूफझाई यांची प्रतिक्रिया दिली आहे. भारतानंतर आता पाकिस्तानात जाणारे पाणी रोखण्याची वेळ अफगाणिस्तानवर आलेली दिसते. युसूफझाई यांच्या म्हणण्यानुसार, सर्वोच्च नेत्यांनी अफगाणी कंपन्यांशी करार करण्याचे निर्देश दिले आहेत. पाकिस्तानात वाहणार्‍या काबूल आणि कुनार नद्या बर्‍याच काळापासून पाकिस्तानमध्ये पाण्याचा मोठा स्रोत म्हणून पाहिल्या जातात. भारतानंतर आता अफगाणिस्ताननेही पाकचे पाणी अडवण्याचा निर्णय घेतल्यानंतर तेथील राज्यकर्त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

480 किमी लांबीची कुनार नदी ईशान्य अफगाणिस्तानातील हिंदूकुश पर्वतरांगांमध्ये आणि पाकिस्तान सीमेजवळील ब्रोघिल खिंडीजवळ उगम पावते. ही नदी कुनार आणि नांगरहार प्रांतांमधून दक्षिणेकडे वाहते. त्यानंतर ती पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वामध्ये प्रवेश करते. तिथे ती जलालाबाद शहराजवळ काबूल नदीला जाऊन मिळते. कुनार नदीला पाकिस्तानमध्ये चित्राल नदी म्हणतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT