पुढारी ऑनलाईन डेस्क : अफगाणिस्तानमध्ये महिलांचे जीवन जास्तीत जास्त खडतर कसे होईल यासाठी तालिबानचे प्रयत्न सुरु असतात. नुकताच तालिबानने फतवा काढला आहे की महिलांनी घराच्या खिडकीतून डोकावताही येणार नाही. त्याच पद्धतीने आता तालिबानने ज्या एनजीओमध्ये महिला काम करतात त्या सर्व एनजीओंवर बंदी आणली आहे.
तालिबानने आपल्या फतव्यात म्हटले आहे की अशा एनजीवोमध्ये महिला तालिबानला अनुसरुन कपडे परिधान करत नाहीत. विशेषतः डोक्यावर घेणारा हेडस्कार्फ योग्य पद्धतीने बांधला जात नाही असे म्हटले आहे. तालिबानच्या अर्थमंत्र्यांनी यासंदर्भात एक्सवर एक पत्र पोस्ट केले आहे. यामध्ये म्हटले आहे की महिलांच्या वेशभूषेचे नियम न पाळणाऱ्या एनजीओंचा परवाना रद्द केला जाणार आहे.
यावर युनायटेड नेशनचे प्रवक्ते फ्लोरेनिका सोतो निनो मार्टिझ यांनी याबाबत प्रतिक्रीया दिली आहे. तालिबानच्या राजवटीत अफगानिस्तानमध्ये महिलांचे हक्क कमी होत आहेत. तसेच या देशातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या दरिद्र्यात जगत आहे, तर मानवतेच्या दृष्टीकोणातूनही अनेकांना मलभूत हक्क मिळत नाहीत यामध्ये महिलाच नाही तर अनेक कुटूंबियांचाही यात समावेश आहेत. आम्ही तालिबानला आवाहन केले आहे की महिलांवर लादलेली काही बंधने शिथिल करावीत.
युनायटेड नेशनचे वरिष्ठ अधिकारी टॉम फ्लेचर यांनी म्हटले आहेकी तालिबानकडून अनेक एनजीवोंवर बंधने आणली जात आहेत. तालिबानच्या नैतिक पोलिसांकडून सरकारला अशा एनजीओंबाबत चुकीचा अहवाल दिला जात आहे. अनेकांना काम थांबविण्यास सांगितले गेले आहे. तर तालिबानने याचा इन्कार केला आहे.