काबूल : अफगाणिस्तानात तालिबान (Taliban) महिलांबाबत पूर्ववत कडक झाले आहे. महिलांबाबतच्या कायद्यांत संपूर्ण शरियत लॉ लागू करण्यात आला असून, सर्वोच्च म्होरक्या मुल्ला हिबतुल्ला अखुंदजादा याच्या मंजुरीनंतर अंमलबजावणीस सुरुवातही झाली आहे. महिलांना घराबाहेर, सार्वजनिक ठिकाणी बोलण्यासही बंदी घालण्यात आली आहे. जाड कपड्याने चेहर्यासह संपूर्ण शरीर झाकून ठेवण्याचे आदेशही लागू झाले आहेत.
हलाल (संमत) काय आणि हराम (निशिद्ध) काय या दोन श्रेणी करण्यात आल्या असून, त्या कठोरपणे लागू झाल्या आहेत. महिलांच्या शिक्षणावरील बंदीनंतर तालिबानचे हे नवे निर्बंध आहेत. संयुक्त राष्ट्रांनी याबद्दल तालिबानचा तीव्र निषेध केला आहे. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार नियमांचे तालिबान उल्लंघन करत असल्याची प्रतिक्रिया संयुक्त राष्ट्रांनी दिली आहे. विविध मानवाधिकार संघटनांनीही आपला आक्षेप नोंदवला आहे.
तालिबानी म्होरक्या अखुंदजादा याने चालू वर्षातच पतीशिवाय इतर पुरुषाशी लैंगिक संबंध ठेवल्यास दोषी स्त्रीला जमिनीत अर्धे गाडून दगडाने ठेचून ठार मारण्यात येईल, अशी शिक्षा लागू केली आहे.
समलैंगिक संबंध ठेवल्याच्या आरोपावरून बघ्यांची गर्दी जमवून 63 जणांना चाबकाचे फटके मारण्यात आले. आरोपींमध्ये 14 महिला होत्या. समलैंगिकता, चोरी आणि अनैतिक संबंधांमध्ये हे 63 लोक दोषी आढळले होते.
इस्लाम ही केवळ एक उपासना पद्धती (मजहब) नाही. ती एक संपूर्ण सामाजिक, राजकीय, प्रशासकीय, सामरिक व्यवस्था (दीन) आहे.
याउपर आधुनिक काळात पाकिस्तानसह बहुतांश इस्लामिक देशांमध्ये या व्यवस्थेची पूर्ण अंमलबजावणी झालेली नाही. हे सारे देशही तालिबानच्या हिशेबाने अल्लाह आणि इस्लामचे गुन्हेगार आहेत.
पाकिस्तानमधील तहरिक-ए-तालिबान-पाकिस्तान ही अफगाण तालिबानचीच एक शाखा आहे. पाक सरकार आणि व्यवस्थेच्या विरोधात पाकिस्तानात ही शाखा दहशतवादाचा अवलंब करते आहे.
महिलांनी सार्वजनिक ठिकाणी बोलणे, घरात गाणे किंवा वाचणेही हराम...
...कारण, महिलांचे स्वरूपच नव्हे, तर महिलांचा आवाज पुरुषांचे लक्ष विचलित करू शकतो.