Pakistan violence | पाकिस्ताननेच पेरलेले विष उलटले 
आंतरराष्ट्रीय

Pakistan violence | पाकिस्ताननेच पेरलेले विष उलटले

‌‘सर तन से जुदा‌’च्या घोषणेने देश पेटला!

पुढारी वृत्तसेवा

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : इस्रायलच्या नावाखाली पाकिस्तानमधील अनेक भाग गेल्या दोन दिवसांपासून हिंसाचाराच्या आगीत होरपळत आहेत. कट्टरपंथी संघटना ‌‘तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान‌’ (टीएलपी) च्या समर्थकांनी देशभरात जाळपोळ आणि हिंसाचार सुरू केला आहे. पोलिसांनी टीएलपी प्रमुख साद रिझवी याला अटक करण्याचा प्रयत्न केल्यानंतर हा हिंसाचार उफाळून आला. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, राजधानी इस्लामाबादकडे येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत.

पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार टीएलपी समर्थकांनी पोलिसांवर दगडफेक आणि लोखंडी सळ्यांनी हल्ले केले. या झटापटीत डझनभर पोलिस जखमी झाले आहेत. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या व लाठीचार्ज केला. काही ठिकाणी गोळीबार झाल्याचेही वृत्त आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओंत आंदोलक पोलिसांकडून वापरलेली अश्रुधुराची आणि गोळ्यांची रिकामी आवरणे दाखवत आहेत.

या हिंसाचाराची सुरुवात 8 ऑक्टोबरला झाली, जेव्हा टीएलपीने इस्रायलविरोधात हिंसक आंदोलनाची घोषणा केली. विशेष म्हणजे इस्रायल आणि हमास यांच्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने युद्धविराम झाला असतानाही टीएलपीने तो नाकारून पाकिस्तानात आंदोलने सुरू केली आहेत. हिंसाचारानंतर शाहबाज शरीफ सरकारने लाहोर आणि इस्लामाबादमध्ये सुरक्षा वाढवली असून फैजाबाद इंटरचेंजवर कंटेनर लावून रस्ते बंद केले आहेत. 2011 मध्ये पंजाबचे गव्हर्नर सलमान तासीर यांची हत्या करणाऱ्या मुमताज कादरीला खादिम रिझवीने ‌‘गाझी‌’ ही पदवी दिली होती. हजारो लोकांचा मोर्चा काढून ही घोषणा संपूर्ण पाकिस्तानात पसरवण्यात आली. तेव्हापासून ही घोषणा पाकिस्तानातील धार्मिक उन्मादाचे प्रतीक बनली आणि आता भारत-बांगला देशसह दक्षिण आशियातील इतर देशांमध्येही पोहोचली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT