पुढारी ऑनलाईन डेस्क : नासाचे अंतराळवीर सुनिता विलियम्स (sunitha williams) आणि बुच विल्मोर अखेर 286 दिवस अंतराळात राहिल्यानंतर सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले. सुरुवातीला आठ दिवसांच्या मोहिमेसाठी गेलेल्या या दोघांना तब्बल नऊ महिने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहावे लागले. यानंतर नासा आणि स्पेसएक्स यांच्या संयुक्त मोहिमेतून त्यांना सुरक्षित आणण्यास यश मिळाले. बोईंग स्टारलायनरवरून 5 जून 2024 रोजी अंतराळात गेलेल्या या दोघांनी आज स्पेसएक्सच्या ड्रॅगन स्पेसक्राफ्टमधून पृथ्वीवर पुनरागमन केले. त्यांच्यासोबत नासाचे अंतराळवीर निक हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गॉर्बुनोव्ह हेदेखील होते.
अंतराळयानाने परतीच्या प्रवासादरम्यान आपल्या पॅराशूटद्वारे फ्लोरिडाच्या समुद्रात यशस्वी लँडिंग केले. नासाच्या पथकाने यानाचे हॅच उघडले आणि अंतराळवीरांना बाहेर येण्यासाठी मदत केली. सुनिता विलियम्स यानातून बाहेर आल्यानंतर हात उंचावून आनंद व्यक्त करताना दिसल्या.
ड्रॅगन स्पेसक्राफ्टने पहाटे 2:41 वाजता ‘डी-ऑर्बिट बर्न’ प्रक्रिया पार पाडली. या प्रक्रियेमध्ये यान आपल्या प्रवासाच्या दिशेने इंजिन चालवून गती कमी करते, ज्यामुळे ते पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करू शकते. त्यानंतर 3:27 वाजता त्याचे यशस्वी लँडिंग झाले.
स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानाने नासाच्या Crew-9 टीमला पृथ्वीवर परत आणण्याची जबाबदारी घेतली. फ्लोरिडामधून Falcon 9 रॉकेटच्या सहाय्याने Crew-10 अंतराळ स्थानकावर पाठवण्यात आले, ज्यामुळे Crew-9 ला पृथ्वीवर परतता आले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन प्रशासनावर टीका करत हे अंतराळवीर संकटात टाकल्याचा आरोप केला. मात्र, व्हाईट हाऊसने या यशस्वी मिशनचे श्रेय घेत ट्रम्प यांनी दिलेला शब्द पाळल्याचे ट्वीट करत सांगितले.
सुनिता विलियम्स आणि बुच विल्मोर यांचे सुरुवातीचे आठ दिवसांचे मिशन जून 2024 मध्ये सुरू झाले होते. मात्र, स्टारलायनर यानाच्या प्रणोदन यंत्रणेत बिघाड झाल्याने ते परतीच्या प्रवासासाठी अयोग्य ठरले. त्यामुळे ते अवकाश स्थानकावर अडकून पडले. अखेर सप्टेंबरमध्ये नासाने स्पेसएक्सच्या Crew-9 यानात त्यांना परतीसाठी समाविष्ट केले.
दीर्घकाळ अंतराळात राहिल्याने सुनिता विलियम्स आणि बु विल्मोर यांना अनेक आरोग्यविषयक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. अवकाशामधील गुरुत्वाकर्षणाचा अभाव हाडांची घनता कमी करतो, स्नायू कमकुवत होतात, तसेच रेडिएशनमुळे दृष्टीवर परिणाम होऊ शकतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनिता विलियम्स यांना खास पत्र पाठवून त्यांचे कौतुक केले. 1 मार्च रोजी लिहिलेल्या या पत्रामध्ये मोदींनी नमूद केले की, अमेरिकेच्या भेटीदरम्यान त्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत सुनिता विलियम्स यांच्या स्थितीबद्दल चर्चा केली होती. "1.4 अब्ज भारतीय तुमच्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगतात. तुमच्या जिद्दीने संपूर्ण जगाला प्रेरणा मिळाली आहे," असे पीएम मोदींनी पत्रात नमूद केले.