इस्लामाबाद; वृत्तसंस्था : वायव्य पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांतात एका सुरक्षा चौकीवर बंडखोरांनी स्फोटकांनी भरलेले वाहन धडकवून आत्मघातकी हल्ला केला. या भीषण हल्ल्यात १२ सैनिकांसह १५ जण ठार झाले आहेत, अशी माहिती पाकिस्तानी सैन्याने शुक्रवारी दिली. प्रतिहल्ल्यात सैन्याने १२ बंडखोरांना टिपल्याचा दावाही सैन्याने केला आहे.
पाकिस्तानी सैन्याच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, हा हल्ला खैबर पख्तुनख्वामधील टँक जिल्ह्यात झाला. दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेली गाडी थेट सुरक्षा चौकीच्या भिंतीवर धडकवली. स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की, चौकीची मुख्य इमारत आणि पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले. मृत्युमुखी पडलेल्या १५ जणांमध्ये १२ लष्करी जवान, २ पोलिस कर्मचारी आणि वन विभागातील एका सरकारी अधिकाऱ्याचा समावेश आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची अधिकृत जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र, या भागात ‘तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ ही संघटना सातत्याने हिंसक कारवाया करत असल्याने संशयाची सुई त्यांच्याकडेच आहे.
अफगाणिस्तान-पाकिस्तान तणावात वाढ
पाकिस्तानमधील या वाढत्या दहशतवादी हल्ल्यांमागे अफगाणिस्तानच्या सीमेचा वापर होत असल्याचा आरोप पाकिस्तान करत आहे. तर, दुसरीकडे तालिबान सरकारने हे आरोप फेटाळून लावले आहेत. या मुद्द्यावरून दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत.