इस्लामाबाद ः बॉम्बस्फोटात कुटुंबीयांचा मृत्य झाल्याने धाय मोकलून रडताना तरुण.  
आंतरराष्ट्रीय

Pakistan | इस्लामाबादेत मशिदीत आत्मघाती हल्ला; 31 जणांचा मृत्यू, दीडशेहून अधिक जखमी

शुक्रवारच्या नमाजावेळी घडवला स्फोट

पुढारी वृत्तसेवा

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपासून काही अंतरावर असलेल्या एका शिया मशिदीमध्ये शुक्रवारी झालेल्या भीषण आत्मघाती स्फोटात किमान 31 जणांचा मृत्यू झाला. 150 हून अधिकजण जखमी झाले. शुक्रवारच्या नमाजादरम्यान झालेल्या या आत्मघाती हल्ल्याने परिसर हादरून गेला. हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुणी स्वीकारलेली नाही. तथापि तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) आणि इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनांवर संशय व्यक्त केला जात आहे.

स्फोटाचा आवाज लांबवर गेला. त्यामुळे स्थानिक लोक घटनास्थळी धावले. सुरक्षा दल आणि पोलिसही दाखल झाले. इस्लामाबाद पोलिसांनी हा स्फोट असल्याचे म्हटले आहे. मदत आणि बचावकार्य सुरू करून जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले. दोघा पोलिस अधिकार्‍यांनी रॉयटर्सला सांगितले की, हल्लेखोराने मशिदीच्या गेटवर थांबूून स्फोट घडवून आणला. या स्फोटात सुरुवातीला मृतांची संख्या 10 असल्याचे सांगण्यात आले होते, ती वाढत गेली आणि 31 वर पोहोचल्याचे वृत्त डॉनने दिले आहे. हा स्फोट घडवून आणल्याचे इस्लामाबादचे उपायुक्त इरफान मेमन यांनी स्पष्ट केले. घटनेचा तपास सुरूअसल्याचे ते म्हणाले.

उझबेकिस्तान अध्यक्षांच्या दौर्‍यावेळी हल्ला

राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. या घटनेच्या संपूर्ण चौकशीचे आदेश दिल्याचे शरीफ यांनी सांगितले. उझबेकिस्तानचे अध्यक्ष शवकत मिर्जियोयेव सध्या दोन दिवसांच्या दौर्‍यावर इस्लामाबादेत आहेत. शरीफ यांच्यासोबत ते एका कार्यक्रमात सहभागी होत असताना हा हल्ला करण्यात आला. कार्यक्रमाचे ठिकाण घटनास्थळापासून काही मैलावर आहे.

आधी गोळीबार, नंतर स्फोट

प्रत्यक्षदर्शींनी जिओ न्यूजला सांगितले की, हल्लेखोराने प्रथम गोळीबार केला व नंतर स्फोट घडवून आणला. मशिदीचा मुख्य दरवाजा इमामबर्गच्या गेटपासून किमान 30 मीटर अंतरावर आहे. हल्लेखोर गेटवर पोहोचताच तेथील रक्षकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोन्हीकडून गोळीबार करण्यात आला. हल्लेखोर मशिदीत किमान 20 मीटरपर्यंत पळत गेला आणि नमाज सुरू असतानाच त्याने स्वतःला उडवून दिले, असे जिओच्या वृत्तात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT