First electric airplane flight Beta Technologies Alia CX300 USA East Hampton to JFK cost Rs 700 Low-cost air travel Zero emission aviation Green aviation technology
वॉशिंग्टन : अमेरिकेतील बीटा टेक्नॉलॉजीज (Beta Technologies) या कंपनीने इतिहास घडवला आहे. त्यांच्या ‘Alia CX300’ या पूर्णपणे इलेक्ट्रिक प्रवासी विमानाने नुकतंच 130 किलोमीटरचं अंतर अवघ्या 694 रूपये ($8) खर्चामध्ये पार केलं आहे.
या विमानाने पूर्व हम्प्टन (East Hampton) येथून न्युयॉर्कमधील जॉन एफ. केनेडी विमानतळापर्यंत (JFK Airport) प्रवास केला. या प्रवासात चार प्रवासी उपस्थित होते आणि संपूर्ण उड्डाण अवघ्या 35 मिनिटांत पूर्ण झालं.
पारंपरिक हेलिकॉप्टरने हेच अंतर पार करण्यासाठी सुमारे रु. 13,885 ($160) खर्च येतो, मात्र ‘Alia CX300’ ने हा प्रवास केवळ 700 रुपयांत पार केल्यामुळे हा एक मोठा टप्पा मानला जात आहे. यामुळे भविष्यात हवाई प्रवास अधिक स्वस्त, प्रदूषणमुक्त आणि सुलभ होण्याची शक्यता आहे.
बीटा टेक्नॉलॉजीजचे संस्थापक आणि सीईओ काईल क्लार्क यांनी सांगितले की, “हे 100 टक्के इलेक्ट्रिक विमान आहे. यामध्ये प्रवास करताना आवाजाचा त्रास होत नाही आणि प्रवासी एकमेकांशी निवांतपणे संवाद साधू शकतात. चार्जिंगचा खर्च फक्त $8 आला.”
बीटा टेक्नॉलॉजीजची स्थापना 2017 मध्ये व्हरमाँट (Vermont) येथे झाली होती. सध्या त्यांनी $318 दशलक्ष इतकं गुंतवणूक भांडवल उभं केलं आहे, जे उत्पादन, प्रमाणन आणि व्यावसायिक वापरासाठी वापरण्यात येणार आहे.
‘Alia CX300’ हे पारंपरिक टेकऑफ करणारे मॉडेल असून, कंपनी 2025 अखेरपर्यंत FAA (Federal Aviation Administration) ची अधिकृत मान्यता मिळवण्याच्या तयारीत आहे.
CX300 विमान एका चार्जमध्ये तब्बल 250 नॉटिकल माईल्स म्हणजे जवळपास 460 किमी अंतर पार करू शकतं. त्यामुळे हे विमान शहरांदरम्यान किंवा उपनगरात अल्प अंतरासाठी उपयुक्त ठरणार आहे.
फक्त बीटा टेक्नॉलॉजीजच नव्हे, तर आर्चर एव्हिएशन (Archer Aviation) सारख्या कंपन्याही हवाई टॅक्सी क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी सज्ज आहेत.
लॉस एंजेलिस ऑलिंपिक 2028 मध्ये अधिकृत एअर टॅक्सी प्रदाता म्हणून आर्चरची निवड झाली आहे. ही वाहतूकप्रणाली 2026 पासून सुरू होण्याची शक्यता आहे.
बीटा टेक्नॉलॉजीजच्या Alia CX300 या पूर्णपणे इलेक्ट्रिक प्रवासी विमानाने केवळ 700 रुपयांत 130 किमी अंतर पार करत हवाई प्रवासाचं भविष्य बदलण्याची क्षमता दाखवून दिली आहे.
स्वस्त, शांत आणि प्रदूषणमुक्त अशा या प्रवासाचा अनुभव लवकरच सामान्य प्रवाशांपर्यंत पोहोचेल, अशी आशा निर्माण झाली आहे.