Strait of hormuz Crisis Pudhari
आंतरराष्ट्रीय

Strait of Hormuz : होर्मुझ सामुद्रधुनीत वाहतूक ठप्पच, इराणने पुन्हा ताबा घेतल्याने इस्लामाबाद शांतता चर्चा धोक्यात

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांती चर्चेसाठी आपले पथक सोमवारी इस्लामाबादला रवाना होईल, असे सांगितले.

पुढारी वृत्तसेवा

तेहरान : इराणने होर्मुझ सामुद्रधुनीवर पुन्हा नियंत्रण प्रस्थापित केल्यानंतर रविवारी जहाज वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. ही सामुद्रधुनी जगातील सुमारे 20 टक्के तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. अमेरिका-इराण दरम्यानचा नाजूक युद्धविराम संपण्याच्या काही दिवस आधीच ही घडामोड घडल्याने जागतिक स्तरावर चिंता वाढली आहे. दरम्यान, इराणने चर्चेची तारीख निश्चित नसल्याचे म्हटले आहे; तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांती चर्चेसाठी आपले पथक सोमवारी इस्लामाबादला रवाना होईल, असे सांगितले.

इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने इशारा दिला की, परवानगीशिवाय सामुद्रधुनीतून जाणाऱ्या कोणत्याही जहाजावर ‌‘शत्रूसोबत सहकार्य‌’ म्हणून कारवाई केली जाईल. इराणने अमेरिकेवर युद्धविरामाचे उल्लंघन केल्याचा आरोप करत स्वतःचा निर्णय बदलला आणि पुन्हा निर्बंध लागू केले.

जहाजांवर हल्ले, वाहतूक ठप्प

शनिवारी दोन भारतीय जहाजांवर हल्ल्याच्या घटना घडल्यानंतर परिस्थिती गंभीर झाली. रविवारी पहाटेपासून कोणतेही जहाज या मार्गाने पुढे सरकले नाही. काही जहाजांना मागे फिरावे लागल्याचे ट्रॅकिंग डेटातून समोर आले आहे. परिणामी शेकडो जहाजे व हजारो खलाशी आखातात अडकून पडले आहेत.

अणुऊर्जेपासून अमेरिका वंचित ठेवू शकत नाही : इराणची स्पष्ट भूमिका

इराणला अणुऊर्जेच्या हक्कांपासून वंचित ठेवण्याचा कोणताही अधिकार अमेरिकेला नसल्याचे इराणी संसदेचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अमेरिका व इराण यांच्यात अणुकार्यक्रमावरून सुरू असलेला वाद आणखी तीव्र झाला आहे. इराणी स्टुडंट न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार, पेझेश्कियन म्हणाले की, ट्रम्प म्हणतात इराणला अणुहक्क वापरता येणार नाहीत. पण त्यासाठी आमचा गुन्हा काय आहे हे ते सांगत नाहीत. एका देशाचे हक्क काढून घेण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? त्यांच्या या वक्तव्यामुळे दोन्ही देशांतील राजनैतिक तणाव अधिक वाढण्याची शक्यता आहे.

तेल दरात वाढ होण्याची शक्यता

युद्धाच्या काळात जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल 120 डॉलर्सवर पोहोचले होते; तर जगभरातील शेअर बाजार कोसळले होते. होर्मुझ पुन्हा खाली करण्याच्या घोषणेनंतर ते 89 डॉलर्सपर्यंत खाली आले होते. मात्र होर्मुझ पुन्हा बंद केल्यामुळे तेलाचे दर सोमवारपासून गगनाला भिडण्याची भीती व्यक्त होत आहे.

चर्चेसाठी पथक इस्लामाबादमध्ये : ट्रम्प

इराणसोबत करार अंतिम टप्प्यात असून सोमवारी अमेरिकन पथक इस्लामाबादमध्ये दाखल होईल, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले. इराणनेही या चर्चेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, इस्लामाबादमध्ये चर्चेची तयार करण्यात येत आहे.

इराणचा चर्चेला नकार

समृद्ध युरेनियम अमेरिकेकडे सोपवण्यास इराण तयार नाही. आमच्या देशाचा अणुऊर्जेचा अधिकार काढून घेणारे ट्रम्प कोण, असा सवाल इराणच्या संसदेचे अध्यक्ष नसूद पेझेश्कियन यांनी केला. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी युरेनियम आणि होर्मुझच्या मुद्द्यावर अद्याप सहमती झालेली नसल्याने थेट चर्चेचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका मांडली.

  • होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजवाहतूक पूर्णपणे थांबली.

  • इराणचा इशारा : परवानगीशिवाय जहाजांवर कारवाई.

  • भारतीय जहाजांवर हल्ल्यांनंतर तणाव वाढला.

  • अमेरिका-इराण चर्चा निष्फळ, युद्धविराम धोक्यात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT