Iran US Talk Hormuz pudhari
आंतरराष्ट्रीय

Iran US Talk Hormuz: इराणनं केलाय मोठा कांड... होर्मुझ पूर्णपणे खुलं करणं आव्हानात्मक; चर्चेत स्पष्टच सांगितलं

Anirudha Sankpal

Iran US Talk Hormuz: पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराणच्या प्रतिनिधी मंडळांमध्ये महत्त्वाची चर्चा सुरू असतानाच एक खळबळजनक अहवाल समोर आला आहे. 'द न्यूयॉर्क टाइम्स'ने दिलेल्या माहितीनुसार, होमुर्जची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) पूर्णपणे खुली करण्यासाठी मोठा कालावधी लागू शकतो. इराणने युद्धकाळात या जलमार्गात बिछावलेल्या समुद्री सुरुंगांचा (Naval Mines) पत्ता लावण्यात आणि ते हटवण्यात इराणची लष्करी यंत्रणा असमर्थ ठरत असल्याचे अमेरिकन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

छोटी जहाजे आणि विखुरलेले सुरंग

अमेरिका आणि इस्रायलसोबत युद्ध सुरू होताच इराणने छोट्या बोटींच्या मदतीने होमुर्जच्या सामुद्रधुनीत मोठ्या प्रमाणावर बारूदी सुरंग पेरले होते. २ मार्च रोजी इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कोअर'ने (IRGC) हा मार्ग बंद केल्याची घोषणा केली होती. मात्र, आता हेच सुरंग इराणसाठी डोकेदुखी ठरत आहेत. न्यूयॉर्क टाइम्सच्या मते, हे सुरंग अत्यंत विस्कळीत पद्धतीने पेरले गेले असून, इराणकडे त्यांच्या नेमक्या ठिकाणांची नोंद नाही. समुद्रप्रवाहामुळे अनेक सुरंग आपल्या मूळ जागेवरून वाहून गेल्याने त्यांचा शोध घेणे तांत्रिकदृष्ट्या कठीण झाले आहे.

ट्रम्प प्रशासनाची मागणी आणि इराणची मर्यादा

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन आठवड्यांच्या संभाव्य युद्धविरामासाठी होमुर्जची सामुद्रधुनी त्वरित आणि सुरक्षितपणे खुली करण्याची अट घातली आहे. मात्र, तांत्रिक मर्यादांमुळे इराणला यावर वेगाने कार्यवाही करणे जमत नाहीये. सध्या इराणने केवळ एक अरुंद मार्ग खुला ठेवला असून, तेथून टोल भरणाऱ्या जहाजांना मार्ग दिला जात आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी स्पष्ट केले की, तांत्रिक सीमा लक्षात घेऊनच हा जलमार्ग टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू केला जाईल.

जागतिक परिणाम

होमुर्जची सामुद्रधुनी पूर्णपणे सुरू न झाल्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती अद्यापही उच्चांकी पातळीवर आहेत. जर हा मार्ग लवकर मोकळा झाला नाही, तर अमेरिका आणि इराणमधील हा तात्पुरता युद्धविराम देखील धोक्यात येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT