पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की ( zelensky) यांच्यात ओव्हल कार्यालयामध्ये शुक्रवारी (दि. २८ फेब्रुवारी) खडाजंगी झाली. यावेळी ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली. यानंतर झेलेन्स्की यांनी माफी मागावी, अशी मागणीही अमेरिकेने केली. एकूणच अमेरिकेने झिडकारल्यानंतर झेलेन्स्की ब्रिटनला रवाना झाले. त्यांनी लंडनमधील १० डाउनिंग स्ट्रीट येथे ब्रिटिश पंतप्रधान किर स्टारमर यांची भेट घेतली. स्टारमर यांनी युक्रेनच्या सार्वभौमत्व आणि सुरक्षेसाठी ब्रिटनच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. ब्रिटन नेहमीच युक्रेनला भक्कम पाठिंबा असेल, असे त्यांनी जाहीर केले. झेलेन्स्की यांनीही आमच्यामध्ये 'अर्थपूर्ण' चर्चा झाली, असेही स्पष्ट केले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झेलेन्स्की यांच्या चर्चेच्या एक दिवसानंतर दोन्ही नेत्यांची ही भेट झाली.या बैठकीत दोन्ही नेत्यांनी युक्रेन आणि युरोपसमोरील आव्हाने, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि मजबूत सुरक्षा हमीसह न्याय्य शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांवर चर्चा केली. बैठकीनंतर झेलेन्स्कीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली. यामध्ये नमूद केले आहे की, 'पंतप्रधान स्टारमर यांच्यासोबतची भेट फलदायी झाली. आम्ही युक्रेन आणि युरोपसमोरील आव्हाने आणि सहकार्य यावर चर्चा केली."
बैठकीदरम्यान युक्रेनच्या संरक्षण क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने कर्ज करारावर स्वाक्षरी झाली. "आज युक्रेन आणि इंग्लंडने कर्ज करारावर स्वाक्षरी केली. यामुळे युक्रेनची संरक्षण क्षमता बळकट होईल. त्याची परतफेड रशियन मालमत्तेतून मिळणाऱ्या उत्पन्नातून केली जाईल. हा खरा न्याय आहे ज्याने युद्ध सुरू केले त्याला किंमत मोजावी लागेल.' असेही झेलेन्स्की यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
झेलेन्स्की यांनी यूके सरकारचे आभार मानत म्हटलं की, 'युद्धाच्या सुरुवातीपासूनच इंग्लंडच्या जनतेने आणि सरकारने दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.'
"झेलेन्स्की यांचे डाउनिंग स्ट्रीटवर स्वागत करणे आणि युक्रेनला माझा अढळ पाठिंबा पुन्हा सांगणे हा एक सन्मान होता," अशी पोस्ट झेलेन्स्की यांच्याशी झालेल्या भेटीनंतर स्टारमर यांनी इंस्टाग्रामवर शेअर केली. तसेच स्टारमरने एक व्हिडिओही शेअर केला आहे. यामध्ये ते झेलेन्स्की यांची गळाभेट घेताना दिसत आहेत. "फक्त शब्दच नाही तर कृतीही," अशी कॅपश्नही त्यांनी दिली आहे. इंग्लंड नेहमीच नेहमीच युक्रेनच्या पाठीशी उभा आहे. रशियाच्या बेकायदेशीर युद्धाचा अंत करणारा आणि युक्रेनच्या भविष्यातील सार्वभौमत्व आणि सुरक्षिततेला सुरक्षित ठेवणारी न्याय्य आणि चिरस्थायी शांतता सुनिश्चित करणारा मार्ग शोधण्याचा मी दृढनिश्चयी आहे, असेही स्टारमर यांनी म्हटलं आहे.