Spiderweb operation file photo
आंतरराष्ट्रीय

Russia Ukraine war | ऑपरेशन स्पायडर्स वेब... ११७ ड्रोनमध्ये ४१ युद्ध विमाने उद्ध्वस्त; युक्रेनचा रशियामध्ये घुसून हल्ला

Spiderweb operation | रशियाला मोठा धक्का देत, युक्रेनने रशियाच्या हद्दीत घुसून लष्करी हवाई तळांना लक्ष्य केले. ऑपरेशन स्पायडर्स वेब अंतर्गत मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ला केला.

मोहन कारंडे

Russia Ukraine war Spiderweb operation

कीव : युक्रेनने रविवारी रशियामध्ये घुसून हल्ला केला. 'स्पायडर वेब' सांकेतिक नाव असलेल्या या अभूतपूर्व गुप्त ऑपरेशनमध्ये रशियातील ४ लष्करी हवाई तळांवरील ४१ युद्ध विमाने उद्ध्वस्त केली. या हल्ल्यात रशियाचे मोठे नुकसान झाले आहे.

युक्रेनच्या सुरक्षा दलांनी सीमा ओलांडण्यासाठी एक अनोखी पद्धत अवलंबली. त्यांनी लाकडी शेडच्या छतावर स्फोटकांनी सुसज्ज ड्रोन लपवले होते. हे शेड ट्रकांमध्ये भरून रशियन हवाई तळांवर नेण्यात आले. ठरवलेल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर, या शेडची छत रिमोट कंट्रोलने उघडली गेली आणि आत लपवलेल्या ड्रोनचा धावपट्टीवर उभ्या असलेल्या विमानांवर वर्षाव केला. रॉयटर्सशी बोलताना एका युक्रेनियन सुरक्षा अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'स्पायडर्स वेब' या सांकेतिक नावाच्या या कारवाईने चार रशियन हवाई तळांना लक्ष्य केले. युक्रेनने रशियात घुसून केलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला होता.

युक्रेनचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला

'स्पायडर्स वेब' नावाची ही कारवाई युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आणि युक्रेनच्या देशांतर्गत गुप्तचर संस्थेचे प्रमुख वासिल मालियुक यांच्या थेट देखरेखीखाली करण्यात आली. नुकसान झालेल्या विमानांची संख्या अद्याप समोर आलेली नाही. परंतु जर ४१ विमान उद्ध्वस्त केल्याचा दावा खरा ठरला, तर हा हल्ला युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनने केलेला सर्वात विनाशकारी ड्रोन हल्ला असेल, ज्यामध्ये ११७ ड्रोन वापरल्याचा दावा केला जात आहे.

लाकडी शेडमध्ये लपले होते ड्रोन

युक्रेनियन अधिकाऱ्याने फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यात एका औद्योगिक गोदामात अनेक ड्रोन तयार असल्याचे दिसत आहे. तसेच छप्परच्या खाली लाकडी शेडमध्ये लपलेले ड्रोन दिसत आहेत. रशियन सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही व्हिडिओंमध्ये ट्रकवर शेड दिसतात आणि त्यांच्या छतांमधून ड्रोन उडताना दिसत आहेत.

रशियाचा Tu-22M सुपरसॉनिक बॉम्बवर्षक नष्ट

या कारवाईचे सर्वात महत्वाचे लक्ष्य रशियाच्या इरकुत्सकमधील बेलाया एअरबेस होते, जे युद्ध क्षेत्रापासून ४,३०० किमी अंतरावर आहे. येथे Tu-22M सुपरसॉनिक बॉम्बवर्षक तैनात होते, जे युक्रेनवरील क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये वापरले जात होते. व्हायरल व्हिडिओमध्ये, Tu-95 सह अनेक बॉम्बवर्षक विमाने जळताना दिसत आहेत. या हल्ल्याचे विशेष म्हणजे या परिसरात सामान्य ड्रोन किंवा क्षेपणास्त्रे पोहचू शकत नाहीत. याचा अर्थ रशियामध्ये युक्रेनियन ड्रोन आधीच गुप्तपणे तैनात केले गेले होते. रशियाने देखील या हल्ल्याची पुष्टी केली आहे.

कोणत्या हवाई तळांना लक्ष्य करण्यात आले होते?

रशियन संरक्षण मंत्रालयाने सांगितले की युक्रेनने मुर्मन्स्क, इर्कुत्स्क, इवानोवो, रियाझान आणि अमूर प्रदेशातील लष्करी विमानतळांवर ड्रोन हल्ले केले. बहुतेक ठिकाणी ड्रोन निष्फळ करण्यात आले, परंतु मुर्मन्स्क आणि इर्कुत्स्कमध्ये जवळून सोडण्यात आलेल्या FPV ड्रोनमुळे काही विमाने जळाली. आग आटोक्यात आणण्यात आली आहे आणि कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

ट्रक घेऊन जाणाऱ्या चालकांची चौकशी सुरू

रशियातील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार ड्रोन घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या चालकांची चौकशी केली जात आहे. आठवड्यापूर्वी रशियाने युक्रेनियन शहरांवर ३६७ क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागून आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला केला होता, ज्यामध्ये तीन मुलांसह १३ नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्या हल्ल्यात कीव, खार्किव्ह, मायकोलाईव्हसह अनेक शहरांचे मोठे नुकसान झाले होते. याचा बदला युक्रेनने घेतला आहे.

दीड वर्षापूर्वी केले होते नियोजन

अहवालांनुसार, ऑपरेशनचे नियोजन करण्यासाठी दीड वर्ष लागले. हे करण्यासाठी, युक्रेनने FPV ड्रोन ट्रकांमध्ये तयार केलेल्या लाकडी केबिनमध्ये लपवून रशियात पाठवण्यात आले होते. कमी खर्चात मोठे नुकसान या हल्ल्यात झाले आहे. FPV ड्रोनची किंमत काही डॉलर्स आहे, तर उद्ध्वस्त केलेल्या ४१ बॉम्बवर्षक विमानांची किंमत अब्जावधी डॉलर्समध्ये आहे. मार्चमध्ये, युक्रेनने ३००० किलोमीटरच्या पल्ल्याचा एक नवीन ड्रोन तयार करण्याची घोषणा केली होती, परंतु त्याबद्दल जास्त माहिती देण्यात आली नव्हती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT