Spain migrant crisis | स्पेनच्या सीमेवर ३४ जणांचा मृत्यू; ६० हजार नागरिकांची घुसखोरी 
आंतरराष्ट्रीय

Spain migrant crisis | स्पेनच्या सीमेवर ३४ जणांचा मृत्यू; ६० हजार नागरिकांची घुसखोरी

; सीमेवर स्थलांतरितांचा महापूर

पुढारी वृत्तसेवा

माद्रिद; वृत्तसंस्था : उत्तर आफ्रिकेतील स्पेनच्या स्युटा या स्वायत्त प्रदेशाच्या सीमेजवळ मोरोक्कोहून झालेल्या स्थलांतरितांच्या अभूतपूर्व लोंढ्याने संपूर्ण युरोप हादरला आहे. गेल्या काही दिवसांत सुमारे ६० हजारांहून अधिक स्थलांतरितांनी समुद्र आणि स्थलमार्गे स्युटामध्ये प्रवेश केला असून या घटनांमध्ये किमान ३४ जणांचा मृत्यू झाला आहे.

या संकटाचा सामना करण्यासाठी स्पेनने सीमावर्ती भागात लष्कर आणि अतिरिक्त पोलिस तैनात केले आहेत, तर मोरोक्कोनेही सीमा ओलांडण्याचे प्रयत्न रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दलांची नियुक्ती केली आहे. स्पेनच्या स्युटा प्रदेशाचे प्रमुख जुआन जेसूस व्हिवास यांनी पत्रकार परिषदेत या घडामोडींची माहिती दिली. स्पेनच्या गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार, मोठ्या संख्येने सीमा ओलांडल्यानंतर सुमारे २५ हजार स्थलांतरित स्वेच्छेने मोरोक्कोमध्ये परतले. मात्र हजारो लोक अजूनही सीमेजवळ ठाण मांडून असून युरोपात प्रवेश करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

समुद्र पोहत, कुंपण ओलांडून प्रवेश

स्युटा हा उत्तर आफ्रिकेतील मोरोक्कोच्या किनाऱ्यावर असलेला स्पेनचा छोटा स्वायत्त प्रदेश आहे. त्यामुळे आफ्रिकेतून युरोपमध्ये पोहोचण्याचा तो सर्वात जवळचा मार्ग मानला जातो. अनेक स्थलांतरित मोरोक्कोतील फ्निदेक या शहरातून सुमारे पाच किलोमीटर अंतर समुद्र पोहत पार करतात, तर काहीजण बेल्युनश परिसरातून कमी अंतराचा मार्ग निवडतात. काही स्थलांतरितांनी सीमा भिंत ओलांडण्याचाही प्रयत्न केला. अनेक जण टायर किंवा तात्पुरत्या तरंगत्या साधनांच्या सहाय्याने समुद्रातून स्पेनच्या हद्दीत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. महिलांसह लहान मुलांचाही या गर्दीत समावेश होता. मोरोक्को तसेच उपसहारा आफ्रिकेतील अनेक देशांतील नागरिक या लोंढ्यात सहभागी आहेत.

स्पेनची कठोर भूमिका

स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेझ यांनी या घुसखोरीला स्पेनच्या प्रादेशिक सार्वभौमत्वाचे उल्लंघन असे संबोधले. त्यांनी मोरोक्को सरकारला स्थलांतरितांचा ओघ रोखण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन केले. स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका निर्णयानुसार समुद्रमार्गे पकडलेल्या स्थलांतरितांना विशेष नियमांखाली तात्काळ परत पाठविण्यावर काही निर्बंध आले आहेत. त्यामुळे प्रशासनास कायदेशीर प्रक्रियेचे पालन करावे लागणार आहे.

सीमेवर हिंसक संघर्ष

सीमेवर हजारो स्थलांतरित जमा झाल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली. मोरोक्कोच्या सुरक्षा दलांनी पाण्याचे फवारे, अश्रुधूर आणि लाठीचार्ज करून लोकांना मागे हटविण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी चकमकी झाल्या. या संघर्षात अनेक वाहने जाळण्यात आली. घटनास्थळी एका बससह सात वाहनांचे जळालेले अवशेष आढळले. पुरेसे पोलिस तैनात नसल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेली घुसखोरी रोखणे शक्य झाले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT