आंतरराष्ट्रीय

Turtles Environmental Damage : स्पेनमध्ये अमेरिकन ‘फ्लोरिडा’ कासवांचा धुमाकूळ

नदी परिसंस्थेसह स्थानिक प्रजाती संकटात, जैविक संतुलनावर गंभीर परिणाम; ३५ वर्षांपूर्वी पाळीव प्राणी म्हणून आणलेल्या विदेशी कासवांची संख्या बेसुमार वाढली

पुढारी वृत्तसेवा

माद्रिद : एखाद्या देशात कासवांची संख्या अचानक अमर्याद वाढली आणि त्यांचा वाढता आकार मानवासह स्थानिक पर्यावरणासाठी डोकेदुखी ठरला तर... सध्या युरोपातील स्पेनमध्ये अशीच चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. सुमारे तीन दशकांपूर्वी अमेरिकेतून पाळीव प्राणी म्हणून आणलेली ‘फ्लोरिडा’ कासवे (Florida Turtle) आता स्पेनसाठी एक मोठी डोकेदुखी ठरली आहेत.

१९८० आणि १९९० च्या दशकात उत्तर अमेरिकेतील ही लहान व हिरव्या रंगाची कासवे स्पेनच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाळली जात होती. कमी जागेत राहू शकत असल्याने लोकांनी त्यांना पसंती दिली.

मात्र, वैज्ञानिक भाषेत Trachemys scripta (पॉन्ड स्लायडर) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कासवांचा आकार जसजसा २० ते ६० सेंटिमीटर आणि वजन ३ ते ४ किलोग्रॅमपर्यंत वाढू लागले, तसतसे नागरिकांनी त्यांना सांभाळणे कठीण झाल्यामुळे थेट नद्या, तलाव आणि सार्वजनिक ठिकाणी सोडून दिले. माद्रिद येथील अटोचा स्टेशनसारख्या ठिकाणीही ३०० हून अधिक कासवे आढळली होती.

स्थानिक परिसंस्थेला मोठा धोका

स्पेनच्या पर्यावरण मंत्रालयाच्या (इकोलॉजिकल ट्रान्झिशन मंत्रालय) यादीनुसार देशात २०० हून अधिक आक्रमक परकीय प्रजाती (Invasive Alien Species) दाखल झाल्या आहेत. यामध्ये फ्लोरिडा कासव सर्वात घातक ठरत आहे. ही कासवे स्थानिक प्रजातींचे अन्न आणि सूर्यप्रकाश मिळवण्याच्या जागांवर ताबा मिळवत असून त्यामुळे स्थानिक कासवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याशिवाय या प्रजातीमुळे ‘साल्मोनेला’ (Salmonella) जीवाणूचा संसर्ग पसरण्याचा धोकाही वाढला आहे.

नियंत्रणासाठी विशेष मोहीम

या वाढत्या संकटाचा सामना करण्यासाठी २०२१ मध्ये एक्स्ट्रेमादुरा प्रादेशिक सरकारने नियंत्रण मोहीम हाती घेतली. याअंतर्गत बडाजोज भागातील गुआडियाना नदीच्या अवघ्या ४ किलोमीटर पट्ट्यातून ५,००० हून अधिक कासवे पकडून हटवण्यात आली आहेत. तरीही देशभरातील जलस्रोतांमध्ये यांची नेमकी संख्या किती आहे, याचा अंदाज लावणे कठीण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT