SpaceX’s Starship returns to launch pad अंतराळ संशोधन क्षेत्रात 'स्पेसएक्स'ने (SpaceX) एक नवा इतिहास रचला आहे. कंपनीचे सर्वात मोठे आणि शक्तिशाली अंतराळयान 'स्टारशिप' (Starship) अंतराळातील आपला आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रवास पूर्ण करून शनिवारी पृथ्वीवर सुखरूप परतले. शुक्रवारी ज्या प्रक्षेपण टॉवरवरून यानाने उड्डाण केले होते, नेमक्या त्याच टॉवरवर या यानाने यशस्वी लँडिंग केले आहे. काल १३ नोव्हेंबर रोजी याच मोहिमेतील खालील रॉकेट बुस्टर पकडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. पण याच रॉकेटचा वरील बुस्टर आज यांत्रिकी हातांनी ( चॉपस्टिक) अलगद पकडला. यामुळे पुनर्वापर करता येण्याजोग्या या रॉकेट तंत्रज्ञान क्षेत्रातील हे मोठे यश मानले जात आहे.
'चॉपस्टिक आर्म्स'मध्ये अचूक लँडिंग
अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील 'लॉन्च पॅड २' वरील यांत्रिक 'चॉपस्टिक आर्म्स'मध्ये (यांत्रिक हात) स्टारशिप यानाने अत्यंत अलगद आणि अचूकपणे प्रवेश केला. पूर्णपणे पुनर्वापर करता येण्याजोगे रॉकेट विकसित करण्याच्या स्पेसएक्सच्या दशकभराच्या प्रयत्नांमधील हा सर्वात मोठा टप्पा आहे. या रॉकेट प्रणालीतील मुख्य यानाची अशा प्रकारे यशस्वी पुनर्प्राप्ती होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
२२ तासांचा प्रवास आणि २६ उपग्रहांचे प्रक्षेपण
जगातील सर्वात मोठ्या आणि शक्तिशाली रॉकेट प्रणालीची ही १५ वी चाचणी मोहीम होती. या मोहिमेदरम्यान स्टारशिपने २२ तासांहून अधिक काळ पृथ्वीभोवती १४ प्रदक्षिणा पूर्ण केल्या आणि २६ 'स्टारलिंक' उपग्रह अवकाशात यशस्वीरित्या प्रस्थापित केले. अब्जाधीश एलॉन मस्क यांच्या मते, स्पेसएक्सचा उपग्रह व्यवसाय वाढवण्यासाठी आणि भविष्यात मानवाला चंद्र व मंगळावर पाठवण्याच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेसाठी हे यश अत्यंत निर्णायक ठरणार आहे.
अमेरिकन अंतराळ संस्था 'नासा'नेही (NASA) या यशाचे स्वागत केले आहे. या दशकाच्या अखेरीस 'आर्टेमिस' मोहिमेअंतर्गत अंतराळवीरांना चंद्रावर उतरवण्यासाठी आणि तेथे कायमस्वरूपी तळ उभारण्यासाठी नासाने स्पेसएक्ससोबत अब्जावधी डॉलर्सचा करार केला आहे.
बूस्टरमधील बिघाडाचा तपास सुरू
एकीकडे मुख्य यानाने ऐतिहासिक यश मिळवले असले तरी, रॉकेटच्या खालच्या भागात म्हणजेच 'सुपर हेवी बूस्टर'मध्ये तांत्रिक बिघाड झाला. शुक्रवारी प्रक्षेपणानंतर काही वेळातच बूस्टर परत मिळवण्याची मोहीम रद्द करावी लागली आणि मेक्सिकोच्या आखातावर हवेतच त्याचा स्फोट झाला. स्पेसएक्सच्या केट टाईस यांनी दिलेल्या माहितीनुसार, बूस्टरची इंजिने निर्धारित वेळेपूर्वीच बंद पडली होती. बूस्टर योग्य स्थितीत नसल्याचे मार्गदर्शक प्रणालीच्या लक्षात येताच, सुरक्षिततेचा उपाय म्हणून स्वयंचलित स्फोट यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. या बिघाडाचे नेमके कारण शोधण्यासाठी अभियंत्यांकडून तपास सुरू आहे.स्पेसएक्सने यापूर्वीच्या तीन चाचणी उड्डाणांमध्ये 'सुपर हेवी बूस्टर' यशस्वीरित्या पकडले होते. अंतराळ प्रवासाचा खर्च कमी करण्यासाठी संपूर्ण रॉकेट प्रणालीचा पुनर्वापर करणे हे स्पेसएक्सचे मुख्य उद्दिष्ट आहे.