Somalia Plane Crash | सोमालियात टेकऑफनंतर प्रवासी विमान बीचवर कोसळले; 55 प्रवासी थोडक्यात बचावले File Photo
आंतरराष्ट्रीय

Somalia Plane Crash | सोमालियात टेकऑफनंतर प्रवासी विमान बीचवर कोसळले; 55 प्रवासी थोडक्यात बचावले

पुढारी वृत्तसेवा

मागोदिशू : सोमालियाची राजधानी मोगादिशू येथे स्टार स्काय एअरलाईन्सच्या एका प्रवासी विमानाचा भीषण अपघात झाला. सोमालियातील अदेन आदे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच ‘स्टार स्काय एअरलाईन्स’चे प्रवासी विमान तांत्रिक बिघाड झाल्याने हिंदी महासागराच्या किनार्‍यावर कोसळले.

सुदैवाने या विमानात असलेल्या सर्व 55 प्रवाशांना आणि कर्मचार्‍यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. हे विमान गलगदुद प्रदेशातील गुरी-एल शहराच्या दिशेने झेपावले होते. प्राथमिक माहितीनुसार, विमानाने उड्डाण केल्यावर अवघ्या काही मिनिटांतच इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. विमानाचे नियंत्रण राखण्याचा प्रयत्न करत असतानाच पंखांचेही नुकसान झाले. त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली. सोमाली नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाचे संचालक अहमद मोआलिम हसन यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

सोमालियन एअरलाइनने वैमानिकांचे केले कौतुक

सोमालियन एअरलाइन ‘स्टारस्काय’ने त्यांच्या वैमानिकांचे विशेष कौतुक केले. प्रसंगावधान राखत आणि जलद निर्णयक्षमता दाखवत त्यांनी विमानाचे यशस्वी क्रॅश लँडिंग केले. या धाडसी आणि तत्पर कृतीमुळे विमानातील सुमारे ५० प्रवाशांचे प्राण वाचले. अपघातानंतर समोर आलेल्या दृश्यांमध्ये विमानाचे पंख तुटलेले तसेच पुढील भागाचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले. अपघाताची तीव्रता लक्षात घेता परिस्थिती अत्यंत भीषण होती. या गंभीर स्वरूपाच्या दुर्घटनेनंतरही विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित बचावले. वैमानिकांच्या धैर्य आणि कुशलतेमुळे संभाव्य मोठी जीवितहानी टळल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT