Sleep Course in America: Pudhari
आंतरराष्ट्रीय

शाळांमध्ये 'झोपेचे धडे'! अमेरिकेत स्लीप कोर्समधून का शिकवली जातेय झोप घेण्याची कला?

Sleep Course in America: ‘झोप कशी घ्यावी’ हे शिकवण्यासाठी सहा भागांचा एक विशेष अभ्यासक्रम

Akshay Nirmale

पुढारी ऑनलाईन डेस्क: अमेरिकेत ओहायो येथील एका शाळेमध्ये ‘झोप कशी घ्यावी’ हे शिकवण्यासाठी सहा भागांचा एक विशेष अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.

झोपेच्या कमतरतेचा विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होत असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच ही एकमेव शाळा नाही तर अमेरिकेतील अनेक शाळांनी आता झोप घेण्याच्या अभ्यासक्रम शिकविण्याच्या दिशेने पावले उचलायला सुरवात केली आहे. (Sleep Classes in America)

ओहायोतील झोप शिकवणारी शाळा – मॅन्सफिल्ड सीनियर हायस्कूल

ओहायोतील मॅन्सफिल्ड सीनियर हायस्कूलमध्ये आता विद्यार्थ्यांना अपेक्षित नसलेला एक नवीन विषय शिकवला जातोय. तो विषय म्हणजे 'झोप कशी घ्यावी?'

आजच्या सोशल मीडियाच्या युगात, जेव्हा तरुण रात्रभर स्क्रोल करत असतात. त्यामुळे 'झोपेचे शिक्षण' ही एक व्यावहारिक गरज बनली आहे. लक्ष केंद्रित करणे, आरोग्य सुधारवणे आणि आनंदी राहण्यासाठी झोप आवश्यक आहे. त्यातून ही संकल्पना पुढे आली.

शाळेतील आरोग्यशिक्षक टोनी डेव्हिस या कोर्सचे नेतृत्व करत आहेत. कोर्सचे नाव आहे – ‘Sleep to Be a Better You.’ हा कोर्स आता येथील आरोग्यशिक्षणाचा एक अनिवार्य भाग बनला आहे.

डेव्हिस म्हणतात की, “हे विचित्र वाटू शकते की हायस्कूलमधल्या मुलांना झोप घ्यायला शिकवावं लागतं. पण खरं सांगायचं तर अनेक मुलांना खरंच झोप कशी घ्यावी हे माहितीच नसतं.”

टीनएजर्स मुले प्रचंड थकलेली असतात...

केवळ रात्री उशिरापर्यंत फोन वापरण्यापुरता हा मुद्दा नाही. उलट संशोधनातून असेही समोर आले आहे की, बहुतांश किशोरवयीन मुले फक्त 6 तास झोप घेतात. खरंतर त्यांना 8 ते 10 तास झोपेची गरज असते.

शारीरिक वाढ, हार्मोन्समधील बदल, तणाव, स्क्रीन टाइम आणि अभ्यासाचा ताण हे सगळं त्यांच्या झोपेवर परिणाम करतं. झोपेची कमतरता ही काही साधी गोष्ट नाही. ती चिंता, नैराश्य, धोकादायक वर्तन, खेळातील दुखापती आणि अपघातांशी देखील जोडली गेली आहे.

तज्ज्ञांच्या मते, टीएनएजर्समधील मानसिक आरोग्य संकटांना सोशल मीडियाहून अधिक जबाबदार गोष्ट आहे ती म्हणजे झोपेचा अभाव.

‘झोपेचा अभ्यासक्रम’ कसा चालतो?

  1. या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना दररोज झोप किती झाली, आणि कशी वाटली, याची नोंद ठेवायला सांगितली जाते.

  2. फोन लवकर बंद ठेवणे, शांत संगीत ऐकणे आणि रात्री हलका आहार घेणे यासारख्या उपायांवर भर दिला जातो.

  3. नेथन बेकर नावाच्या विद्यार्थ्याने कबूल केलं की, YouTube वरचा त्याचा रात्रीचा वेळ झोपेत अडथळा आणत होता. पण कोर्सनंतर तो रात्री 7 तास झोप घेतो. आयुष्य खूपच सुलभ झाल्याची प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली आहे.

किशोरवयीन वर्तन की झोपेच्या कमतरतेचा परिणाम?

  • रागटपणा, अति प्रतिक्रियाशीलता आणि उत्साहाचा अभाव हे किशोरवयीन वर्तन वाटत असलं तरी, बहुतेक वेळा ते झोपेच्या अभावामुळे असतं.

  • स्लीप स्पेशॅलिस्ट कायला वॉलस्ट्रॉम म्हणतात, “लहान मुलं झोप न मिळाल्यावर कशी हट्टी होतात, तसंच किशोरवयीन मुलंही वागतात फक्त ते प्रौढ पद्धतीनं वागतात.”

  • मेंदुच्या स्कॅनवरूनही देखील काही गोष्टी सिद्ध झाल्या आहेत. झोपेच्या कमतरतेमुळे मेंदूचा prefrontal cortex (निर्णय घेणे व भावना नियंत्रण) कमजोर होतो, तर amygdala (भीती व चिंता निर्माण करणारा भाग) अधिक सक्रिय होतो.

अमेरिकेतील इतर शाळांचं योगदान

  1. सध्या अमेरिकेत मॅन्सफिल्ड हायस्कूल ही झोप शिकवणारी एकमेव शाळा नाही.

  2. मिनेसोटातील अनेक शाळांनी कायला वॉलस्ट्रॉम यांच्या या मोफत अभ्यासक्रमाचा अवलंब केला आहे.

  3. न्यू यॉर्क सिटीतील काही शाळांमध्येही झोप शिक्षणाचे उपक्रम सुरू झाले आहेत.

  4. मॅसेच्युसेट्स, वॉशिंग्टन, ओरेगॉन यांसारख्या राज्यांतील खासगी शाळा झोपेचं महत्त्व मानसिक आरोग्य कार्यक्रमात समाविष्ट करत आहेत.

  5. काही शाळांनी तर विद्यार्थ्यांसोबत पालकांसाठीही कार्यशाळा घेतल्या आहेत. कॅलिफोर्निया आणि फ्लोरिडासारख्या राज्यांनी तर शाळा सुरू होण्याची वेळ 8:30 AM केल्यासंबंधी कायदे पारित केले आहेत.

झोप “शिकणं” गरजेचं...

अर्ध्याहून अधिक विद्यार्थी कबूल करतात की, ते झोपताना फोनकडे पाहत झोपतात. 60 टक्क्यांहून अधिक विद्यार्थी फोनचाच अलार्म घड्याळ म्हणून वापर करतात. पण एकट्या फोनवर दोष देणं चुकीचं ठरेल. विद्यार्थी अभ्यास, खेळ आणि इतर उपक्रमांमध्ये इतके गुरफटलेले असतात की झोपेसाठी पुरसेा वेळ मिळतच नाही.

तज्ज्ञांच्या मते, किशोरवयीन मुलांनी केवळ जास्त झोप घ्यावी, एवढाच यावरील उपाय नाही. तर त्यांना कशी झोप घ्यावी हे शिकवणं आवश्यक आहे. मॅन्सफिल्डसारख्या शाळा हेच करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT