पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकी काँग्रेसच्या (US Congressmen) सहा खासदारांनी बायडेन प्रशासनाच्या न्याय विभागाकडून अदानी समुहावर (Adani Group) करण्यात आलेल्या कारवाई विरुद्ध चौकशीची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी अमेरिकेच्या नवनियुक्त ॲटर्नी जनरल पॉम बॉन्डी यांना पत्र लिहिले आहे. यातून त्यांनी अमेरिकेच्या न्याय विभागाने (DOJ) घेतलेल्या निर्णयांविरुद्ध प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
कथित लाचखोरी प्रकरणी अदानी समूहाविरुद्धच्या आरोपपत्रामुळे अमेरिकेचा जवळचा मित्रदेश असलेल्या भारताशी द्विपक्षीय संबंध बिघडू शकतात", असे ६ अमेरिकन काँग्रेस खासदारांनी पत्रात म्हटले आहे. लान्स गुडेन, पॅट फॅलन, माइक हॅरिडोपोलोस, ब्रँडन गिल, विल्यम आर. टिमॉन्स आणि ब्रायन बॅबिन यांनी हे पत्र १० फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या ॲटर्नी जनरल पॉम बॉन्डी यांना लिहिले आहे. त्यातून तत्कालीन बायडेन प्रशासनाच्या अंतर्गत अमेरिकेच्या न्याय विभागाने घेतलेल्या काही शंकास्पद निर्णयांकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
अदानी समूहाविरुद्धची चौकशी कोणत्याही आधाराशिवाय करण्यात आली. या प्रकरणात अमेरिकेचे कसल्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. विदेशी ताकदीच्या प्रभावाखाली चौकशीचे आदेश देण्यात आले. या चौकशीमुळे भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंधांत बाधा निर्माण झाली. भारतासोबत संबंध बिघडले तर त्याचा थेट फायदा चीनला होईल. डोनाल्ड ट्रम्प सत्तेत येण्यापूर्वी चौकशीचे आदेश का देण्यात आले? असा सवाल ६ खासदारांनी केला आहे.
सोलर पॉवर कॉन्ट्रक्ट्ससाठी अनुकूल अटींच्या बदल्यात भारतीय अधिकाऱ्यांना सुमारे २,१०० कोटी रुपयांची (२५० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) लाच देणे आणि सुमारे ३ अब्ज डॉलर्स उभारण्यासाठी आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचा अदानींवर आरोप आहे. दरम्यान, अदानी समुहाने अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ जस्टिस आणि यूएस सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने केलेले आरोप वारंवार फेटाळून लावले आहेत.