Tourist Submarine Sank pudhari
आंतरराष्ट्रीय

इजिप्तच्या किनाऱ्यावर पाणबुडी बुडाली; 6 रशियन पर्यटकांचा मृत्यू

Tourist Submarine Sank: लाल समुद्राच्या किनाऱ्यावरील हर्गडा या इजिप्शियन शहरातील घटना

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क: इजिप्तमध्ये हर्गडा या शहरात एक पर्यटन पाणबुडी बुडाल्याची घटना घडली आहे. या पाणबुडीतून 45 रशियन पर्यटक प्रवास करत होते. त्यामध्ये काही लहान मुलांचादेखील समावेश होता. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर नऊ जण जखमी झाले आहेत. त्यातील चौघांची प्रकृती गंभीर आहे.

दरम्यान, 29 प्रवाशांना सुखरूप वाचवण्यात आले आणि त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. (six dead and nine injured in tourist submarine sank off the coast of Hurghada Egypt)

स्थानिक वेळेनुसार दुपारी 1 वाजता हर्गडाच्या बंदराजवळ ही पाणबुडी बुडाली. इजिप्शियन नौदल, तटरक्षक दल आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी पोहोचली. शोध आणि बचावकार्य सुरू आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी घटनास्थळी रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सेवा तैनात करण्यात आल्या.

सर्व रशियन प्रवासी

या पाणबुडीवर सर्व प्रवासी रशियन नागरिक होते. इजिप्तमधील रशियन दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, सिंदबाद हॉटेलच्या मालकीची ही पाणबुडी असून त्यातून 45 रशियन पर्यटक जात होते. यात काही अल्पवयीन मुलांचाही समावेश होता.

हे सर्व पर्यटक "बिब्लिओ ग्लोबस" आणि त्यांचा इजिप्शियन भागीदार "बिब्लिओ ग्लोबस इजिप्त टूर्स" द्वारा आयोजित टूरमध्ये आले होते. रशियन जनरल कॉन्सुलेटचे राजनैतिक अधिकारी सध्या सिंदबाद हॉटेलच्या गोदीवर उपस्थित असून परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.

पाणबुडीचे आकर्षण

सिंदबाद नावाची ही पाणबुडी हर्गडा शहरामध्ये अनेक वर्षांपासून पर्यटकांचे आकर्षण आहे. या पाणबुडीमध्ये 45 प्रवाशांसाठी जागा असून मोठी काच असलेल्या खिडकीतून जलजीवन पाहता येते. या पाणबुडीच्या जाहिरातीत या सहलीचा उल्लेख "एअर-कंडिशनयुक्त सुविधा आणि सुरक्षितता" असा करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

सिंदबाद पाणबुडीला यापूर्वीही तांत्रिक अडचणी आल्या होत्या, त्यामुळे तिच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी आणि पाणबुडीच्या देखभालीचा आढावा घेण्यासाठी तपास सुरू आहे.

हर्गडा हे विशेषतः युरोपियन पर्यटकांसाठीचे एक मोठे पर्यटन केंद्र आहे, त्यामुळे अशा दुर्घटनांमुळे पर्यटन सुरक्षेबाबत चिंता वाढू शकते. या अपघातानंतर इजिप्तमधील पाणबुडी पर्यटनावर अधिक कठोर नियम लावण्याचा दबाव प्रशासनावर येऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT