Singapore sinkhole rescue 7 Indian workers to be honoured
सिंगापूर : सिंगापूरमध्ये एका कारसह एक महिला सिंकहोलमध्ये अडकली असताना, तिला वेळेत बाहेर काढून तिचा जीव वाचवणाऱ्या 7 भारतीय स्थलांतरित कामगारांना सिंगापूरचे राष्ट्रपती थरमन शनमुगरत्नम् यांनी राष्ट्रपती भवनात (इस्ताना) आमंत्रित केले आहे. हे सर्व कामगार 3 ऑगस्ट रोजी होणाऱ्या 'इस्ताना ओपन हाऊस' या विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
पिचाई उदैयप्पन सुबय्या (47) – साईट फोरमन
वेल्मुरुगन मुथुस्वामी (27)
पूमालाई सरवनन (28)
गणेशन वीरसेकर (32)
बोस अजितकुमार (26)
नारायणासामी मयाकृष्णन (25)
सथपिल्लै राजेंद्रन (56)
हे सर्वजण ओहिन कन्स्ट्रक्शन कंपनीत काम करत असून, सिंकहोलमध्ये पडलेल्या कारमध्ये अडकलेल्या महिलेचा जीव वाचवण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
घटना तंजोंग कतोंग रोड साऊथ येथे घडली. अचानक रस्त्याचा काही भाग कोसळून एक सिंकहोल तयार झाले. यात एक कार पडली आणि ती पाण्याने भरलेल्या खड्ड्यात अडकली.
फोरमन सुबय्या यांनी आवाज ऐकून परिस्थितीचे गांभीर्य ओळखले आणि लगेच तिथे धावत गेले. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना दोर खाली फेकायला सांगितले आणि महिलेचा जीव धोक्यात येण्यापूर्वीच तिला बाहेर काढले.
सिंगापूरचे राष्ट्रपती थरमन शनमुगरत्नम् यांनी या भारतीय कामगारांचे कौतुक करत फेसबुकवर लिहिले आहे की,"शाबास! फोरमन सुबय्या यांच्या नेतृत्वाखालील स्थलांतरित कामगारांनी वेळीच आणि धाडसाने पाऊल उचलले."
राष्ट्रपती कार्यालयाने स्पष्ट केले की, "इस्ताना ओपन हाऊस दरम्यान या स्थलांतरित कामगारांना राष्ट्रपतींसोबत संवाद साधण्याची संधी मिळेल."
सिंगापूरमधील "इट्स रेनींग रेनकोट्स" (IRR) या संस्थेने या कामगारांसाठी निधी संकलन सुरू केले. एकूण 1639 दात्यांनी SGD 72241 इतकी रक्कम जमा केली आहे. ही रक्कम या सातही कामगारांच्या बँक खात्यात विभागून दिली जाणार आहे.
दरम्यान, सिंगापूरच्या "मिनिस्ट्री ऑफ मॅनपॉवर" अंतर्गत ACE (Assurance, Care and Engagement) ग्रुप ने या कामगारांचे आभार मानले आणि त्यांना ACE Coin प्रदान केला. ACE Coin हा त्या व्यक्तींना दिला जातो जे स्थलांतरित कामगारांच्या कल्याणासाठी विशेष योगदान देतात.