अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार file photo
आंतरराष्ट्रीय

Donald Trump Shooting : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार

गोळी ट्रम्प यांच्या उजव्या कानाला चाटून गेली

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. पेनसिल्व्हेनियामध्ये एका प्रचार रॅलीदरम्यान त्यांच्यावर गोळीबार झाला. गोळी ट्रम्प यांच्या उजव्या कानाला लागली. सुरक्षा रक्षकांनी त्यांना स्टेजवरून खाली उतरवले आणि कारमध्ये नेले. गोळीबारात हल्लेखोरासह दोघांचा मृत्यू झाला आहे.

हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या कानातून रक्त येत असल्याचे दिसले. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्यात एक ट्रम्प समर्थक ठार झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच एका अज्ञात हल्लेखोराचाही मृत्यू झाला आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याचा निषेध केला आहे. "अमेरिकेत अशा प्रकारच्या हिंसाचाराला जागा नाही," असे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. सध्या ट्रम्प आणि बायडेन निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत, याच दरम्यान हा हल्ला झाला.

डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित

सीक्रेट सर्व्हिसने एका निवेदनात म्हटले आहे की, ट्रम्प सुरक्षित आहेत आणि त्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. ट्रम्प स्टेजवरून खाली आल्यानंतर लगेचच पोलिसांनी रॅलीचे मैदान रिकामे केले. सीक्रेट सर्व्हिस या गोळीबाराचा तपास करत आहेत. एफबीआयची टीमही घटनास्थळी पोहोचली आहे. बटलर काउंटी डिस्ट्रिक्ट ॲटर्नी रिचर्ड गोल्डिंगर यांनी सांगितले की, संशयित बंदूकधारी व्यक्तीला गोळी मारण्यात आली. रॅलीत सहभागी झालेल्या एकाचा मृत्यू झाला असून आणखी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

गोळी माझ्या कानाच्या चाटून गेली : ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प यांनीही या घटनेवर निवेदन जारी केले आहे. ते म्हणाले, "आपल्या देशात असे घडू शकते यावर विश्वास बसत नाही. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीबद्दल सध्या कोणतीही माहिती नाही, जो आता मरण पावला आहे. माझ्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला गोळी लागली होती. काहीतरी गडबड होत असल्याचे मला कळले, मोठा आवाज ऐकू आला, गोळ्यांचा आवाज ऐकू आला, लगेच गोळी कानाला लागून गेल्याचे जाणवले."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT