पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचे मोठे भाऊ शाहिद अख्तर यांच्या अंत्यविधीला प्रतिबंधित दहशतवादी संघटना ‘लष्कर-ए-तोयबा’शी संबंधित उपस्थित असल्याचे समोर आले आहे.  Pudhari
आंतरराष्ट्रीय

Shoaib Akhtar brother funeral : शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीला ‘लष्कर’च्‍या म्‍होरक्‍याची उपस्‍थिती! व्हिडिओ व्हायरल

Shoaib Akhtar brother funeral : पाकिस्‍तानचा 'दहशतवादी' चेहरा पुन्‍हा एकदा उघड

पुढारी वृत्तसेवा

Shoaib Akhtar brother funeral : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचे मोठे भाऊ शाहिद अख्तर यांच्या अंत्यविधीला प्रतिबंधित दहशतवादी संघटना ‘लष्कर-ए-तोयबा’शी संबंधित उपस्थित असल्याचे समोर आले आहे. या अंत्यविधीचे व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले असून, यामध्ये शोएब अख्तरसोबत ‘लष्कर-ए-तोयबा’च्‍या राजकीय शाखाचा म्‍होरक्‍या स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत.

‘लष्‍कर-ए-तोयबा’कडून व्हिडिओ जारी

शाहिद अख्तर यांच्या अंत्यविधीला 'पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीग' या ‘लष्कर-ए-तोयबा’च्‍या राजकीय आघाडीचे इस्लामाबादचा अध्यक्ष इनाम-उर-रहमान कम्बोह उपस्थित होता. त्‍याची छायाचित्रे आणि व्हिडिओ आता समोर आले आहेत. विशेष म्हणजे, हा व्हायरल व्हिडिओ लष्कर-ए-तैयबाची राजकीय शाखा असलेल्या 'पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीग'कडून अधिकृतपणे जारी केला आहे. शाहिद अख्तरच्या अंत्यसंस्कारावेळी पीएमएमएल इस्लामाबादचे अध्यक्ष इनाम-उर-रहमान कंबोह, उपमहासचिव अब्दुल्ला तूर, झोनल सरचिटणीस हाफिज उमर आणि खिदमत कमिटीचे अध्यक्ष अमजद भट्टी उपस्थित होते. लष्कर प्रमुख हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईद हा या 'पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीग'चा म्‍होरक्‍या आहे.

पाकिस्‍तानचा 'दहशतवादी' चेहरा पुन्‍हा एकदा उघड

'पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीग' ही प्रत्यक्षात 'जमात-उद-दावा' या प्रतिबंधित संघटनेचाच एक भाग आहे. या घटनेमुळे पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा एकदा जगासमोर उघडा पडला आहे. हा व्हिडिओ हेच सिद्ध करतो की, पाकिस्तान अजूनही दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान आहे. गेल्या काही दिवसांत सईद सार्वजनिक कार्यक्रमात दिसण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात तो पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांचे विशेष सहाय्यक राणा सनाउल्लाह यांच्यासोबत एकाच व्‍यासपीठावर दिसला होता. दोघांमध्ये बरीच चर्चाही झाली होती.

'पाकिस्‍तान दहशतवादी संघटनांसाठी आश्रयस्‍थळ'

पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना संरक्षण आणि सुरक्षित तळ यावर भारताने सातत्याने चिंता व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्रांसह (UN) जागतिक व्यासपीठांवर कारवाईची मागणी केली आहे. मार्च २०२६ मध्‍ये एका अमेरिकन अहवालातही पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी, विशेषतः भारताला लक्ष्य करणाऱ्या संघटनांसाठी सुरक्षित आश्रयस्‍थळ असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. 'काँग्रेसनल रिसर्च सर्व्हिस'ने २५ मार्च रोजी जारी केलेल्या अहवालात नमूद केले होते की, "पाकिस्तान आपल्या भूमीवर उघडपणे सक्रिय असलेल्या काही दहशतवादी संघटना आणि व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे."

शाहिद अख्तर यांच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट

पाकिस्‍तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याचा मोठे भाऊ शाहिद यांचे निधन झाले. मात्र, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. शोएब अख्तरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत लिहिले होते, "माझे लाडके मोठे भाऊ शाहिद अख्तर यांचे निधन झाले आहे, हे सांगताना अत्यंत दुःख होत आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT