कानसाई (जपान)
आंतरराष्ट्रीय पातळीवर आज छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जयंती साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त जपान, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेशसह अनेक राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा केला. यावेळी उपस्थित राष्ट्रांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला.
संयुक्त राष्ट्र संघाच्या सुचनेनुसार सध्या जगभरातील अनेक राष्ट्रांना जपानच्यावतीने नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून जपानमध्ये विशेष कार्यशाळा सुरू आहे. या कार्यशाळेत भारतासह झांबिया, नेपाळ, म्यानमार, सर्बिया, इजिप्त, ब्राझील, बांगलादेश, पाकिस्तान, इराण, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका आदी देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. महाराष्ट्राच्यावतीने या आपत्ती निवारण कार्यशाळेत पुणे पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता हेमंत धुमाळ हे सहभागी झाले आहेत. या कार्यशाळेतच आज छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त त्यांना आंतरराष्ट्रीय समुदायाच्यावतीने अभिवादन करण्यात आले.
शिवरायांच्या जयंतीनिमित्त जपान विदेश मंत्रालयाने विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. शासकीय पातळीवर 'जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीच्या'वतीने रितसर शिवजयंती कार्यक्रमाच्या पत्रिका छापून शिवजयंती महोत्सवासाठी सर्वांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी अनेक देशांचे शासकीय प्रतिनिधी उपस्थित होते. छत्रपती शिवराय आणि त्यांच्या कार्याबद्दल आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरूवातीपासूनच आदर आणि आकर्षण आहे. आज शिवजयंतीच्या निमित्ताने त्याचा पुन्हा प्रत्यय आला. सुरूवातीला उपस्थित सर्व राष्ट्रांच्यावतीने शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर हेमंत धुमाळ यांनी छत्रपती शिवरायांच्या कार्याचा आणि त्यांनी केलेल्या संग्रामाचा उपस्थितांना परिचय करून दिला. शिवरायांचे कार्य ऐकून यावेळी उपस्थित असलेल्या अनेक देशांचे प्रतिनिधी अचंबित झालेले पाहायला मिळाले. यानंतर उपस्थित सर्व राष्ट्रांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या नावांचा जयघोष करण्यात आला. यावेळी जपान सरकारच्यावतीने दरवर्षी शिवजयंती साजरी करण्याचे जाहीर करण्यात आले.
किंग ऑफ इंडिया!
जपान सरकारच्यावतीने शिवजयंती महोत्सवानिमित्त छापण्यात आलेल्या पत्रिकेत छत्रपती शिवरायांचा उल्लेख 'ग्रेट फिलॉसॉफर अॅन्ड द किंग ऑफ इंडिया' असा करण्यात आला आहे. यावरून आंतरराष्ट्रीय पातळीवर शिवरायांच्या कार्याचा किती सन्मान केला जातो आणि त्यांच्याविषयी आंतरराष्ट्रीय पातळीवर किती मोठ्या प्रमाणात आदर व्यक्त केला जातो, याचा प्रत्यय आल्याशिवाय रहात नाही.