ढाका; वृत्तसंस्था : बांगला देशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनाला पूरबाचल न्यू टाऊन प्रोजेक्टमधील प्लॉट वाटपात गडबड केल्याप्रकरणी 26 वर्षांची एकूण शिक्षा सुनावण्यात आली आहे. ढाकाच्या विशेष न्यायालयाने सोमवारी हा निकाल जाहीर केला. दरम्यान, या प्रकरणात हसीना यांची बहीण रेहाना आणि भाची ट्यूलिप रिजवाना सिद्दीक ज्या ब्रिटनमधील माजी खासदार आहेत, यांचाही सहभाग होता. कोर्टाने त्यांनादेखील शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील इतर 14 आरोपींनाही 5 वर्षांची शिक्षा देण्यात आली आहे.
दरम्यान, शेख हसीना यांना अजून दोन प्रकरणांत शिक्षा मिळणे बाकी आहे, हे प्रकरण पूरबाचल न्यू टाऊन प्रोजेक्टशी संबंधित आहे. या गुन्ह्याची सुनावणी ढाकाच्या स्पेशल कोर्ट-4 मध्ये झाली आणि 29 साक्षीदारांच्या साक्षींनंतर निकाल देण्यात आला.
गुन्ह्याची पार्श्वभूमी अँटिकरप्शन कमिशनने जानेवारी 2025 मध्ये हसीना यांच्यविरुद्ध या प्रकरणातील 6 गुन्हे नोंदवले. यापैकी हे चौथे प्रकरण आहे जिथे हसीनाला शिक्षा झाली आहे. यापूर्वी तीन प्रकरणांतून एकूण 21 वर्षांची शिक्षा झाली होती. या प्रकरणात आवास व सार्वजनिक बांधकाम मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, माजी राज्य मंत्री शरीफ अहमद आणि हसीना यांचे खासगी सचिव यांचाही समावेश आहे. त्यापैकी बहुतेक फरार आहेत; केवळ खुर्शीद आलम सध्या तुरुंगात आहेत.
ट्यूलिपवर आरोप आहे की तिने ब्रिटनच्या सत्तारूढ लेबर पार्टीतील आपल्या माजी खासदारपदाचा दबाव वापरून प्लॉट मिळवले. तिने आपल्या आई शेख रेहाना, बहीण अजमीना सिद्दीक आणि भाऊ रदवान मुजीब सिद्दीक यांच्या नावावर अवैधरीत्या 7 हजार चौरस फुटाचे भूखंड मिळवले. ट्यूलिप सिद्दीक यांनी 14 जानेवारी 2025 रोजी ब्रिटन सरकारमधील आर्थिक सचिव (ट्रेजरी) पदावरून राजीनामा दिला होता.
शेख हसीना 5 ऑगस्ट 2024 रोजी बांगला देशातील तख्तापलटानंतर भारतात आल्या. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाविरुद्ध अनेक भ्रष्टाचार प्रकरणे सुरू झाली आहेत. हसीना यांना यापूर्वीच 17 नोव्हेंबर 2025 रोजी इंटरनॅशनल क्राईम्स ट्रिब्यूनलने हत्या आणि हिंसाचारासाठी मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.
शिक्षेचा तपशील
शेख हसीना : 5 वर्षांचा कारावास
शेख रेहाना (बहीण) : 7 वर्षांचा कारावास
ट्यूलिप (भाची, ब्रिटनच्या माजी खासदार) : 2 वर्षांचा कारावास
प्रत्येकाला 1 लाख टका दंड
दंड न भरल्यास अतिरिक्त 6 महिन्यांचा कारावास