पुढारी ऑनलाईन डेस्कः लॉस एंजलिस मध्ये आजवरचा भीषण वनवा लागला आहे. या आगीत हॉलीवूडमधील अनेक सेलिब्रींटींची घरे भस्मसात झाली आहेत. अजूनही आग आटोक्यात आलेली नाही. आता या आगीत ज्यांचे सर्वस्व जळाले आहे त्यांच्यासाठी मदतीचा ओघ सुरु झाला आहे. यामध्ये हॉलिवूडमधील सेलिब्रेटींचाही समावेश आहे. कॅलीफोर्नियामधील इस्टेट एजंट असलेल्या जिना कूपर यांनी आपल्या मित्र - मैत्रिणींकडे कपडे व इतर साहित्याची मदत करण्याचे आवाहन केले होते. याबाबतचे वृत्त रॉयटर्स या वृत्तवाहिनीने दिले आहे.
या आवाहनाची दखल घेत हॉलिवूड सेलिब्रीटी असलेल्या अभिनेत्री शेरॉन स्टोन व हॅले बेरी यांनी आपले कपडे जळीतग्रस्तांसाठी दान केले आहेत. कपड्यांबरोबरच स्वेटर्स, शूज, हॅन्डबॅग, बेल्ट पायजमा यासारख्या वस्तू त्यांनी दान केल्या आहेत. या त्यांच्या पर्सनल कलेक्शनमधील वस्तू आहेत.
याबाबत ऑस्कर विजेती अभिनेत्री हॅले बेरी हिने इन्स्टांग्रामवर लिहले आहे. ‘मी माझ्याजवळचे सर्व कपडे देऊन टाकले आहेत. तुम्ही जर दक्षिण कॉलिफोर्नियात राहत असाल तर तूम्हीही असेच करा’ असे आवाहन तिने केले आहे.
जिना कूपर हीने मदतीसाठी घरासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याचे दुकान सुरु केले आहे. ‘COOP’ असे याचे नामकरण केले आहे. या दुकानात लोकांनी मदत केलेल्या वस्तू ठेवल्या आहेत. यामध्ये ज्यांना ज्या वस्तू गरजेच्या आहेत त्यांनी त्या घेऊन जायच्या आहेत.
तर शेरान स्टोन हीने समाजमाध्यमावर मदतीचे आवाहन केले आहे. तिच्या आवाहनाला अनेकांनी प्रतिसाद दिला आहे. शेरॉन व तिची बहिण केली स्टोन यांनी कपडे व बेड जळीतग्रस्तांना दिले आहेत. केली या मदतीसाठी उघडलेल्या दुकानात स्वयंसेवक म्हणून काम करतात. या दिलेल्या कंपड्यामध्ये अनेक ब्रँडेड कपड्यांचाही समावेश आहे.
जिना कूपर म्हणाल्या की आम्ही केलेल्या आवाहनानुसार अभिनेते, वकील, रेस्टॉरंटचालक, तसेच न्युयार्कमधील इस्टेट एजंट यांनी जळीतग्रस्तांना मदत केली आहे. तसेच हॉलीवूडमधील एका स्टायलिस्टने दोन मोठ्या बॅग भरुन कपडे दान केले आहेत. ज्या लोकानी या आगीमध्ये सर्वस्व गमावले आहे. त्यांच्यासाठी ही मदत खूप गरजेची आहे असे अनेकांनी मत व्यक्त केले आहे.