पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेच्या न्यू ऑर्लिन्समधील (New Orleans attack) बोर्बन स्ट्रीटवर नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान एका ड्रायव्हरने पिकअप ट्रक गर्दीत घुसवल्याने किमान १५ लोक ठार झाले. तर सुमारे ३० लोक जखमी झाले. हा दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने एफबीआय तपास करत आहे.
या प्रकरणी संशयित म्हणून एका ४२ वर्षीय अमेरिकेच्या लष्करातील सेवानिवृत्त सैनिकाचे नाव पुढे आले. या प्रकरणी एफबीआयकडून सांगण्यात आले आहे की, अधिकाऱ्यांशी झालेल्या गोळीबारात मृत्यू झालेल्या संशयिताच्या वाहनात घटनेच्यावेळी इसिसचा (ISIS) झेंडा होता. हे वाहन टुरोमार्फत भाड्याने घेतले आले होते, असे कंपनीने सांगितले. हल्लेखोर शम्सुद्दीन जब्बार याने प्रथम गर्दीत ट्रक घुसवला आणि नंतर त्याने जमावावर गोळीबार केला. त्यात १५ ठार आणि किमान ३० जखमी झाले. या घटनेनंतर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात त्याचाही मृत्यू झाला.
लोकप्रिय फ्रेंच क्वार्टरमध्ये झालेला हा हल्ला एका मैलाहून कमी अंतरावर झाला; जिथे बुधवारी शुगर बाऊलचे आयोजन केले जाणार होते. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव वार्षिक कॉलेज फुटबॉल खेळ २४ तासांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे, असे बाउलच्या सीईओने म्हटले आहे.
या प्रकरणी तपासादरम्यान वाहनात बंदुका आणि इतर उपकरणांसह एक आईडी स्फोटक सापडले. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितले की, एफबीआयला असे काही व्हिडिओ सापडले आहेत; जे हल्लेखोराने हल्ल्याच्या काही तास आधी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यात त्याने असे म्हटले होते की तो इस्लामिक स्टेट गटाद्वारे प्रेरित असून त्याने नरसंहार इच्छा व्यक्त केली होती. सीएनएनने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, संशयिताने व्हिडिओ रेकॉर्ड केले आहेत. त्यात त्याने ISIS मध्ये सामील होण्याचे स्वप्न होते, असा उल्लेख केला आहे.
या व्हिडिओमध्ये जब्बार त्याच्या घटस्फोटाबद्दलदेखील बोलला आणि त्याच्या कुटुंबाला मारण्याच्या उद्देशाने सेलिब्रेशन करण्याचा त्याचा प्लॅन आहे. पण त्याने नंतर त्याचा प्लॅन बदलला आणि तो ISIS मध्ये सामील झाला, सीएनएनने पुढे वृत्तात म्हटले आहे.
पब्लिक रेकॉर्ड्सनुसार, जब्बारने (Shamsud-Din Jabbar) ह्यूस्टनमध्ये रिअल इस्टेटमध्ये काम केले आहे. त्याच्या एका व्हिडिओमध्ये, त्याचा जन्म ह्यूस्टनच्या १३० किमी पूर्वेला असलेल्या ब्युमाँट शहरात झाला. त्याने १० वर्षे अमेरिकेच्या सैन्यात मानवी संसाधन आणि आयटी तज्ज्ञ म्हणून काम केले. जब्बार मार्च २००७ ते जानेवारी २०१५ दरम्यानच्या काळात नियमित सैनिक म्हणून होता. त्यानंतर तो जानेवारी २०१५ ते जुलै २०२० दरम्यान आर्मी रिझर्व्हमध्ये होता. तो फेब्रुवारी २००९ ते जानेवारी २०१० पर्यंत अफगाणिस्तानमध्ये सुरक्षेसाठी तैनात होता.