पुढारी ऑनलाईन डेस्क
फ्रान्स संसदेच्या निवडणुकीसाठी (France Elections 2024) रविवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले होते. तर सोमवारी सकाळपासून निकाल जाहीर होत आहेत. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत धक्कादायक निकाल समोर येत आहे. या निवडणुकीत डाव्या विचारसरणीच्या न्यू पॉप्युलर फ्रंट (NFP) ने अधिक जागांवर विजय मिळवत आघाडीने घेतली आहे. तर राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (President Emmanuel Macron) यांच्या एन्सेम्बल युतीला बसला आहे. दरम्यान, निवडणुकीचे निकाल जाहीर होत असाना फ्रान्समध्ये हिंसाचार वाढला आहे.
सीएनएनच्या वृत्तानुसार, हाती आलेल्या निकालानुसार डावी आघाडी न्यू पॉप्युलर फ्रंटने १८२ जागा जिंकल्या आहेत. तर मॅक्रॉन यांच्या एन्सेम्बल आघाडीने १६३ जागा मिळवल्या आहेत. तर मरीन ले पेनच्या नॅशनल रॅलीने (आरएन) १४३ जागांपर्यंत मजल मारली आहे.
फ्रान्समधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्याच महिन्यात समाजवादी, ग्रीन्स, कम्युनिस्ट आणि कट्टर डावे फ्रान्स अनबोव्हड यांनी एकत्र येऊन न्यू पॉप्यूलर फ्रंटची स्थापना केली. या आघाडीने मॅक्रॉन यांना धक्का दिला आहे.
५७७ जागा असलेल्या फ्रान्सच्या नॅशनल असेंब्लीमध्ये बहुमतासाठी २८९ जागा आवश्यक आहेत. पण येथे कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. यामुळे नाटो शिखर परिषदेच्या दोन दिवस आधी आणि पॅरिस ऑलिम्पिकच्या तीन आठवड्यांपूर्वी नवीन सरकार स्थापन होण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान, मॅक्रॉन यांच्या जवळचे पंतप्रधान गॅब्रिएल अट्टल यांनी सोमवारी सकाळी राजीनामा देण्याची घोषणा केली. पंतप्रधान गॅब्रिएल अट्टल यांनी म्हटले आहे की ते त्यांचा राजीनामा सोमवारी मॅक्रॉन यांच्याकडे देतील. पण विशेषत: तोंडावर असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आपण सेवा करण्यास तयार असल्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. “आपला देश अभूतपूर्व राजकीय परिस्थितीशी सामना करत आहे आणि पण यासोबतच काही आठवड्यांत येणाऱ्या जगातील खेळाडूंचे स्वागत करण्याचीदेखील तयारी करत आहे,” असे अटल म्हणाले.
दरम्यान, निवडणुकीचे निकाल जाहीर होताच डाव्या पक्षांच्या समर्थकांना जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. मध्य पॅरिसमधील रिपब्लिक स्क्वेअरमध्ये डाव्या पक्षाचे समर्थक विजयाचा जल्लोष करण्यासाठी जमले होते. त्यांनी यावेळी विजयाचा जयघोष केला.