पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतात आश्रय घेतलेल्या बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान पंतप्रधान शेख हसीना यांविरुद्ध कायदेशीर कारवाई होणार आहे. त्यामुळे भारताने त्यांना बांगला देशकडे सोपवावे, अशी मागणी बांगला देशचे परराष्ट्र मंत्री तौहीद हुसेन यांनी माध्यमांशी बोलताना केली. तसेच यासंदर्भात भारताशी पत्र व्यवहारही करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
५ ऑगस्ट २०२५ रोजी शेख हसीना यांनी बांगलादेशमधील अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे भारतात आश्रय घेतला. तब्बल १६ वर्षांच्या त्यांची राजवट संपुष्टात आली. ढाकास्थित आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने शेख हसीना आणि अनेक माजी कॅबिनेट मंत्री, सल्लागार आणि लष्करी आणि नागरी अधिकाऱ्यांवर अटक वॉरंट जारी केले आहे.
परराष्ट्र मंत्री तौहीद हुसेन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, शेख हसीना यांना बांगला देशकडे सुपूर्द करावे, अशी मागणी आम्ही भारत सरकारला संदेश पाठवून केली आहे. आम्ही शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाबाबत परराष्ट्र मंत्रालयाला पत्र पाठवले आहे. ही प्रक्रिया सध्या सुरू आहे. ढाका आणि नवी दिल्ली यांच्यात प्रत्यार्पण करार अस्तित्वात आहे. या करारानुसार हसीना यांना बांगलादेशात परत आणले जाऊ शकते.
बांगलादेशला १९७१ साली स्वातंत्र्य मिळाले. बांगलादेशात स्वातंत्र्यापासून आरक्षण व्यवस्था लागू आहे. त्याअंतर्गत स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांसाठी ३० टक्के, देशातील मागास जिल्ह्यातील तरुणांसाठी १० टक्के, महिलांसाठी १० टक्के, अल्पसंख्याकांसाठी ५ टक्के आणि अपंगांसाठी एक टक्के आरक्षणाची तरतूद होती. बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमध्ये एकूण ५६ टक्के आरक्षण होते. 2018 मध्ये बांगलादेशातील तरुणांनी या आरक्षणाविरोधात निदर्शने केली. अनेक महिन्यांच्या आंदोलनानंतर बांगलादेश सरकारने आरक्षण संपल्याची घोषणा केली. 5 जून रोजी बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने देशातील आरक्षणाची जुनी व्यवस्था पुन्हा लागू करण्याचे आदेश दिले. शेख हसीना सरकारनेही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अपील केले, परंतु सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश कायम ठेवला. यामुळे विद्यार्थी संतप्त झाले आणि त्यांनी आंदोलन सुरू केले. बांगलादेशातील विद्यापीठांतून सुरू झालेला विरोधाला हिंसक वळण लागले. देशभरात हिंसाचाराचा वणवा वाढल्यानंतर अखेर शेख हसीना यांनी पलायन करुन भारतात आश्रय घेतला होता.
बांगलादेशमधील हिंसाचार प्रकरणी हसीना आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांविरोधात गुन्हे आणि नरसंहाराच्या 60 हून अधिक तक्रारी दाखल आहेत. शेख हसीना यांच्यावर 225 खटले दाखल आहेत. यामुळे खुनाचे 194 गुन्हे, मानवतेविरुद्ध आणि नरसंहाराचे 16 गुन्हे, अपहरणाचे तीन गुन्हे, खुनाच्या प्रयत्नाचे 11 गुन्हे आणि बांगलादेश राष्ट्रवादीच्या रॅलीवरील हल्ल्याचा एक खटल्याचा समावेश आहे.