Salesforce AI
नवी दिल्ली : AI चा बोलबाला आता ओसरू लागला असल्याचे चित्र दिसत आहे. एकेकाळी जनरेटिव्ह AI चे जोरदार समर्थन करणारी 'सेल्सफोर्स' या दिग्गज सॉफ्टवेअर कंपनीने 'लार्ज लँग्वेज मॉडेल्स' वरील आपले अवलंबीत्व आता मर्यादीत केले आहे.
सेल्सफोर्सने 'एजंटफोर्स' या AI प्लॅटफॉर्मद्वारे कामांचे ऑटोमेशन करून हजारो कर्मचाऱ्यांना Rebalanced केले असून आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) धोरणातही सुधारणा केली आहे. कंपनीचे सीईओ मार्क बेनिऑफ यांनी एका पॉडकास्टमध्ये खुलासा केला की, AI च्या वापरामुळे सपोर्ट टीम ९,००० वरून ५,००० पर्यंत कमी झाली. मात्र, कंपनीने नंतर स्पष्ट केले की, त्यांनी यातील शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून न काढता प्रोफेशनल सर्व्हिसेस, सेल्स आणि कस्टमर सक्सेस यांसारख्या विभागांत 'रीडिप्लॉय' (बदली) केले आहे.
'द इन्फॉर्मेशन'च्या रिपोर्टनुसार, सेल्सफोर्सच्या प्रॉडक्ट मार्केटिंगच्या वरिष्ठ उपाध्यक्ष संजना परुळेकर म्हणाल्या, "एका वर्षापूर्वी आम्हा सर्वांचा लार्ज लँग्वेज मॉडेल्सवर जो विश्वास होता, तो आता तितका राहिलेला नाही." सेल्सफोर्सने आता आपली रणनीती बदलली असून, अनिश्चित निकाल देणाऱ्या AI ऐवजी 'डिटरमिनिस्टिक' ऑटोमेशनवर लक्ष केंद्रित केले आहे.
AI ला जेव्हा एकापेक्षा जास्त सूचना दिल्या जातात, तेव्हा ते कामात चुका करते किंवा दिलेल्या सूचना विसरते, असे निरीक्षण तंत्रज्ञांनी नोंदवले आहे. 'AI मॉडेल्सना जास्त सूचना दिल्यास ते मुख्य उद्दिष्ट विसरतात. ग्राहक जेव्हा चॅटबॉटला मूळ विषय सोडून प्रश्न विचारतात, तेव्हा चॅटबॉट आपले मुख्य काम सोडून भरकटतो. त्यामुळे आता जनरेटीव्ह एआयचा वापर सरसकट करण्यापेक्षा आवश्यक तिथेच करण्याचे धोरण अवलंबले जात आहे,' असे त्यांचे मत आहे.