मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशियाच्या हवाई हद्दीत एक व्यावसायिक विमान पाडल्याच्या घटनेसाठी शेजारी देश अझरबैजानची माफी मागितली आहे. या दुर्घटनेत ३८ जणांचा मृत्यू झाला होता. त्याला रशिया जबाबदार असल्याचे मात्र पुतीन यांनी मान्य केले नाही.
नाताळाच्या दिवशी झालेल्या या दुर्घटनेबाबत पुतीन म्हणाले, की रशियन हवाई संरक्षण यंत्रणा युक्रेनचे ड्रोन परतवून लावत होत्या, त्या दरम्यान ही दुःखद घटना घडली. विमान चेचेन्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करत असताना त्यावर रशियाच्या हवाई संरक्षण दलाने हल्ला केल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे विमानाला कॅस्पियन समुद्राकडे वळावे लागले होते. विमानाला कझाकिस्तानमध्ये अपघात झाला आणि त्यातील ६७ पैकी ३८ जणांचा मृत्यू झाला होता.
२५ डिसेंबरला कझाकिस्तानातील अकताऊ विमानतळावरील धावपट्टीपासून ३ कि.मी. अंतरावर लैंडिंग करत असताना हे विमान क्रैश झाले होते. विशेष म्हणजे या विमानाने सुरुवातीला दक्षिण रशियातील ग्रोझनी विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न केला होता. अपघातानंतर अझरबैजान एअरलाइन्सने रशियाच्या ७ शहरांसाठीची उड्डाणे स्थगित केली आहेत. दुसरीकडे युक्रेनच्या गुप्तचर संचालनालयानेही या विमान अपघातासाठी रशियाला जबाबदार धरले आहे.