russian oil tanker India
नवी दिल्ली : चीनच्या दिशेने निघालेल्या रशियन तेलवाहू जहाजाने दक्षिण चीन समुद्रातून अचानक आपला मार्ग बदलला आहे. आता हे जहाज वेगाने भारताकडे येत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची आयात वाढवण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड मानली जात आहे.
जहाज ट्रॅकिंग डेटानुसार, 'अॅफ्रामॅक्स टँकर अॅक्वा टायटन' रशियाचे 'युराल्स क्रूड' घेऊन २१ मार्च रोजी न्यू मंगलोर बंदरात पोहोचणे अपेक्षित आहे. या जहाजावर जानेवारीच्या अखेरीस बाल्टिक समुद्रातील बंदरातून तेल भरण्यात आले होते. येथून ते चीनच्या 'रिझाहो' बंदरात जाणार होते.मात्र आता आग्नेय आशियाई समुद्रात या जहाजाने अचानक आपला मार्ग बदलला आणि भारताच्या दिशेने प्रवास सुरू केला. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी पत्रकार परिषदेत या घडामोडीला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
इराणने इस्रायल आणि अमेरिकेसोबतच्या संघर्षामुळे 'होर्मुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) बंद केल्याने निर्माण झालेल्या ऊर्जा संकटाचा सामना करण्यासाठी अमेरिकेने भारताला रशियन कच्च्या तेलाची खरेदी वाढवण्याची मुभा दिली आहे. जगातील २० टक्क्यांहून अधिक तेल आणि द्रव नैसर्गिक वायूचा (LNG) पुरवठा याच सामुद्रधुनीतून होतो. या सवलतीनंतर, भारतीय रिफायनर्सनी वेगाने हालचाली करत एका आठवड्यात सुमारे ३ कोटी बॅरल रशियन तेलाची खरेदी केली आहे. मध्यपूर्वेतील पारंपारिक पुरवठादारांकडून होणारी घट भरून काढण्यासाठी भारत प्रयत्नशील असल्याचे यावरून दिसून येते.
भारतासोबतच आता जपान आणि दक्षिण कोरिया यांसारख्या देशांनीही रशियाकडून तेल खरेदी पुन्हा सुरू केली आहे. यामुळे येणाऱ्या काळात कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. 'वॉर्टेक्स लिमिटेड' या संस्थेच्या माहितीनुसार, आतापर्यंत किमान सात रशियन तेलवाहू जहाजांनी चीनकडे जाणारा आपला मार्ग बदलून भारताकडे वळवला आहे. भारतातील सर्व प्रमुख रिफायनर्स सध्या रशियन बाजारपेठेत सक्रिय झाले आहेत.