Russian missile Ukraine swimming pool file photo
आंतरराष्ट्रीय

Viral Video: लोक पोहत असताना थेट छतातून कोसळलं रशियन क्षेपणास्त्र; युक्रेनमधील स्विमिंग पूलचा अंगावर काटा आणणारा VIDEO

युक्रेनच्या झॅपोरिझिया शहरात रशियन क्षेपणास्त्र हल्ल्याचा एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Russian missile Ukraine swimming pool

झॅपोरिझिया (युक्रेन): युक्रेनच्या झॅपोरिझिया शहरात रशियन क्षेपणास्त्र हल्ल्याचा एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. येथील एका इनडोअर स्विमिंग पूलाच्या छतातून एक रशियन क्षेपणास्त्र थेट आत कोसळले. ज्यावेळी हा हल्ला झाला, तेव्हा अनेक नागरिक तिथे पोहत होते. या भीषण हल्ल्यातून पोहणारे नागरिक थोडक्यात बचावले असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये हल्ल्याची भीषणता स्पष्टपणे दिसत आहे. क्षेपणास्त्राच्या धडकेमुळे छताला मोठे भगदाड पडले असून, त्यातून थेट सूर्यप्रकाश आत येताना दिसतोय. हल्ल्यानंतर छताचे सिमेंटचे तुकडे, काचा आणि इतर ढिगारा स्विमिंग पूलच्या परिसरात विखुरला गेला. अचानक झालेल्या या स्फोटामुळे घाबरलेल्या नागरिकांनी जीवाच्या आकांताने सुरक्षित ठिकाणी पळ काढला.

युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाने झॅपोरिझिया शहराला लक्ष्य करत केलेल्या मोठ्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा हा एक भाग होता. या संपूर्ण हल्ल्यात ७ जण जखमी झाले आहेत. मात्र, स्विमिंग पूलच्या आत असलेल्या नागरिकांपैकी कोणी जखमी झाले आहे का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही, असे 'फॉक्स न्यूज'ने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

रशियाचे युक्रेनवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचे भीषण हल्ले

आपल्यावरील हल्ल्यांचा बदला घेण्यासाठी रशियाने युक्रेनच्या विविध शहरांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा मारा तीव्र केला आहे. गुरुवारी पहाटे रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हवर मोठा हल्ला केला. यात किमान २७ लोकांचा मृत्यू झाला असून ९१ जण गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण माऱ्यात शहरातील सुमारे १३० इमारतींचे प्रचंड नुकसान झाले आहे. युक्रेनच्या हवाई दलाने 'रॉयटर्स'ला दिलेल्या माहितीनुसार, रशियाने एकाच रात्रीत ७४ क्षेपणास्त्रे आणि ४९६ ड्रोन डागले.

९ मजली इमारत जमीनदोस्त

या हल्ल्यात निप्रो नदीच्या पूर्व किनाऱ्यावरील एका ९ मजली निवासी इमारतीला रशियन क्षेपणास्त्राने थेट लक्ष्य केले. या हल्ल्यात इमारत पत्त्यांसारखी कोसळली असून, सुमारे ६४ फ्लॅट्स पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. या ढिगाऱ्याखाली अनेक नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून, युक्रेनमध्ये सध्या अत्यंत युद्धजन्य आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT