पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की ( zelensky) यांच्यात ओव्हल कार्यालयामध्ये शुक्रवारी (दि. २८ फेब्रुवारी) खडाजंगी झाली. यावेळी ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली. हा वादग्रस्त सामना थेट प्रक्षेपित केला गेला आणि आधुनिक काळातील ओव्हल ऑफिसमधील अशाप्रकारचा हा एकमेव प्रसंग ठरला. दरम्यान, या प्रसंगानंतर रशियाच्या आनंदाला उधाण आलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना मारहाण करण्यापासून स्वतःला रोखले, अशी खोचक प्रतिक्रियाही रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी दिली आहे. (Zelensky-Trump meeting)
रशियाच्या सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी टेलिग्रामवर पोस्टमध्ये म्हटलं आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी अमेरिकेचा अनादर केल्याचा आरोप केलेल्या झेलेन्स्की यांना जोरदार चपराक लगावली आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची वाटचाल तिसऱ्या महायुद्धाकडे सुरु आहे, असा आरोप करत युक्रेनला मिळणारी लष्करी मदत तत्काळ थांबवण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. झेलेन्स्की यांचा वापर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी आपल्या कार्यकाळात करुन घेतला, असा आरोपही त्यांनी केला आहे. (Trump-Zelensky meeting)
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी म्हटलं आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपाध्यक्ष व्हान्स यांनी झेलेन्स्की यांच्यावर हल्ला करण्यापासून स्वतःला रोखले. हा एक चमत्कारच होता. ज्यांनी पोसले तेच हात तोडण्यासाठी झेलेन्स्की यांचा प्रयत्न सुरु होता. रशिया आणि अमेरिकेतील मैत्रीपूर्ण संबंधांमुळे युक्रेन आणि त्याचे युरोपीय मित्र देश चिंतेत आहेत. आपल्या सुरक्षेला धोका निर्माण होईल, असा करार .ट्रम्प आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन करतील अशी त्यांना भीती आहे. (Trump-Zelensky meeting)
क्रेमलिनचे माजी सल्लागार सर्गेई मार्कोव्ह यांनी म्हटले आहे की, ओव्हल ऑफिसमधील संघर्षामुळे झेलेन्स्कीच्या राजकीय कारकिर्दीच्या शेवट सुरु झाला आहे. तर रशियाच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे उपसभापती कॉन्स्टँटिन कोसाच्योव्ह म्हणाले की, गोंधळानंतर झेलेन्स्कीची ओळख पटली आहे आणि त्याचे खरे रंग आता जगासमोर येत आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात झेलेन्स्की यांचे वर्णन "निवडणुकांशिवाय हुकूमशहा" असे केले होते. यानंतर आता ओव्हल कार्यालयामध्ये ट्रम्प आणि झलेलेन्स्की यांच्यात झालेल्या खंडाजंगीने दोन्ही देशांमधील संबंधामुळे आणखी कटुता येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की ( zelensky) यांच्यात ओव्हल कार्यालयामध्ये शुक्रवारी (दि. २८ फेब्रुवारी) भेट झाली. ट्रम्प आणि व्हेन्स यांनी युक्रेनला दिलेल्या अमेरिकेच्या मदतीबद्दल झेलेन्स्की यांनी पुरेशी कृतज्ञता व्यक्त केली नाही, असा आरोप केला आणि त्यांच्या इच्छेनुसार शांतता करार मान्य करण्यासाठी दबाव टाकला. या चर्चेदरम्यान आवाज चढले, तणाव वाढला आणि ट्रम्प यांनी थेट धमकी दिली की, जर झेलेन्स्की यांनी त्यांचा प्रस्ताव मान्य केला नाही, तर अमेरिका युक्रेनला पूर्णतः सोडून देईल. झेलेन्स्की यांना मध्येच थांबवत व्हेन्स म्हणाले की, ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांसमोर स्वतःची बाजू मांडणे हा अनादर आहे आणि त्यांनी ट्रम्प यांचे नेतृत्व मान्य करून त्यांचे आभार मानले पाहिजेत. त्याचवेळी ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना सांगितले, तुमची परिस्थिती चांगली नाही आणि तुम्ही तिसर्या महायुद्धासोबत जुगार खेळत आहात. काही मिनिटांनंतर, ट्रम्प यांनी उर्वरित भेटच रद्द करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की शांततेसाठी तयार नाहीत; कारण त्यांना वाटते की, अमेरिकेच्या सहभागामुळे त्यांना वाटाघाटींमध्ये मोठा फायदा मिळतो. ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडियावर लिहिले, मला कोणालाही फायदा द्यायचा नाही, मला शांतता हवी आहे. त्यांनी ओव्हल ऑफिसमध्ये अमेरिकेचा अनादर केला. ते जेव्हा शांततेसाठी तयार असतील, तेव्हा परत येऊ शकतात. यानंतर, झेलेन्स्की काही वेळातच काळ्या एसयूव्हीमधून व्हाईट हाऊस सोडून गेले.