नवी दिल्ली; वृत्तसंस्था : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दबाव झुगारून भारताने रशियाकडून इंधन खरेदी सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. रशियानेही भारताला इंधन खरेदीवर विशेष सवलत जाहीर केल्यामुळे इंडियन ऑईल (आयओसी) आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांनी अमेरिकेच्या आयात शुल्काचे निर्बंध झुगारून कच्च्या तेलाची खरेदी सुरूच ठेवली आहे.
अमेरिकेचे ट्रेझरी सचिव स्कॉट बेसेंट यांनी भारतातील काही श्रीमंत कुटुंबे रशियासोबतच्या तेल व्यापारातून नफा कमावत असल्याचा आरोप केला असतानाही भारत आणि रशियातील व्यापार सुरूच आहे. रशियाने भारताला तेलपुरवठा सुरू ठेवण्यासाठी एक विशेष यंत्रणा सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर इंडियन ऑईल आणि भारत पेट्रोलियमने सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यासाठी रशियन कच्च्या तेलाची खरेदी केली आहे, अशी माहिती कंपनीच्या दोन वरिष्ठ अधिकार्यांनी बुधवारी ‘रॉयटर्स’ला दिली.
या घडामोडींमुळे भारताच्या तेल खरेदीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष केंद्रित झाले आहे. भारताने पुन्हा आयात सुरू केल्याने रशियाचा सर्वात मोठा खरेदीदार असलेल्या चीनसाठी तेलाचा पुरवठा कमी होऊ शकतो, अशीही चर्चा आहे. जुलै महिन्यात रशियन तेलावरील सवलती कमी झाल्याने आणि अमेरिकेने केलेल्या टीकेनंतर भारताने खरेदी थांबवली होती.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन तेलाची खरेदी सुरू ठेवल्याबद्दल भारताला दंड म्हणून भारतीय वस्तूंवर 27 ऑगस्टपासून अतिरिक्त 25 टक्के शुल्क लावण्याची धमकीही दिली आहे. या घडामोडींमुळे भारत, अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यातील ऊर्जा आणि राजनैतिक संबंधांवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ट्रम्प यांच्या आयात शुल्काच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात त्रिसदस्यीय बैठक लवकरच होण्याची शक्यता आहे. अमेरिका सध्या रशियन क्रूड खरेदीवरून भारत आणि चीनवर दबाव आणत आहे. या पार्श्वभूमीवर त्रिसदस्यीय बैठकीत अमेरिकन आयात शुल्कास प्रत्युत्तर देण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याची माहिती रशियातील उच्चपदस्थांनी दिली.