Russia Kamchatka earthquake
कामचटका: रशियाच्या कामचटका द्वीपकल्पाच्या पूर्व किनाऱ्याजवळ आज (दि. १३) सकाळी जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ७.१ रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली आहे. त्यानंतर, त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेस ने सांगितले की, भूकंपाची खोली सुमारे १० किलोमीटर होती.
दरम्यान, अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षण ने या भूकंपाची तीव्रता ७.४ आणि खोली ३९.५ किलोमीटर नोंदवली आहे. पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने हा भूकंप त्सुनामीच्या लाटा निर्माण करू शकतो, असा इशारा दिला आहे.
हे तेच क्षेत्र आहे, जिथे जुलैमध्ये ८.८ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप आला होता. त्यामुळे प्रशांत महासागरातील अनेक देशांमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता. जपानच्या सार्वजनिक प्रसारक एनएचकेनुसार, जपान हवामान विज्ञान एजन्सीने सध्या कोणताही त्सुनामीचा इशारा जाहीर केलेला नाही.