राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या भेटीनंतर तणाव वाढला
टोकियो/मॉस्को : वृत्तसंस्था
रशिया आणि जपान यांच्यातील वादग्रस्त बेटांवरून सुरू असलेल्या संघर्षात आता नवी ठिणगी पडली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या नुकत्याच पार पडलेल्या वादग्रस्त बेटांच्या दौऱ्यानंतर, रशियन नौदलाने या परिसरात शक्तिशाली क्षेपणास्त्र चाचण्या घेतल्या आहेत. या लष्करी हालचालींवर जपानने तीव्र नाराजी व्यक्त करत कडक शब्दांत आक्षेप नोंदवला आहे.
रशियन नौदलाच्या पॅसिफिक फ्लीटने एटोरोफू बेटावरून 'बास्टियन' क्षेपणास्त्रांची चाचणी घेऊन शत्रूच्या जहाजांवर हल्ला करण्याचा सराव केला. यात आण्विक पाणबुडी आणि गाईडेड-मिसाईल क्रूझरचा समावेश होता. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी स्वतः ‘वार्याग’ या युद्धनौकेवरून या सरावाचे निरीक्षण केले. नाटोच्या वाढत्या प्रभावामुळे रशियाच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याचे पुतिन यांनी नमूद केले.
जपानची तीव्र प्रतिक्रिया व राजनैतिक वाद
पुतिन यांच्या दौऱ्यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांच्या राजदूतांना समन्स बजावले होते. ओमान दौऱ्यावर असलेले जपानचे परराष्ट्रमंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी स्पष्ट केले की, जपानच्या हद्दीतील बेटांवर रशियाची लष्करी उपस्थिती सहन केली जाणार नाही. जपानने या मोठ्या प्रमाणावरील लष्करी सरावाविरोधात औपचारिक निषेध नोंदवला आहे.