लिबरल पार्टीतील ज्येष्ठ नेत्यांनी बंडाची तलवार उपसल्यानंतर ट्रुडो यांना अखेर राजीनामा द्यावा लागला. Pudhari File Photo
आंतरराष्ट्रीय

खलिस्तानवाद्यांना गोंजारणे ट्रुडोंना भोवले

भारत, कॅनडामध्ये 2015 पासून दुरावा निर्माण होण्यास सुरुवात

पुढारी वृत्तसेवा

ओटावा : कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्याविरोधात सत्ताधारी लिबरल पार्टीतील ज्येष्ठ नेत्यांनी बंडाची तलवार उपसल्यानंतर ट्रुडो यांना अखेर राजीनामा द्यावा लागला. 53 वर्षीय ट्रुडो यांनी गेल्या 9 वर्षांपासून खलिस्तानवाद्यांचे लांगूनचालन करीत सत्ता कॅनडावर एकहाती अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला होता.

कोव्हिडनंतर कॅनडाची आर्थिक घडी पुरती विस्कटली होती. ट्रुडो यांनी अमेरिकेविरोधातील धोरणांचा पुरस्कार केला होता. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाल्यानंतर ट्रुडो यांच्याविषयी त्यांच्या पक्षात असंतोष उफाळला होता. खलिस्तानवादी दहशतवादी हरदीपसिंह निज्जर यांच्या हत्येप्रकरणी ट्रुडो यांनी थेट भारतावर आरोप केला होता. यानंतर दोन्ही देशातील संबंधात तणाव निर्माण झाला होता. 2015 पासूनच ट्रुडो आणि भारतातील संबंधामध्ये दुरावा येण्यास प्रारंभ झाला होता.

2015

या साली ट्रुडो यांची कॅनडाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली होती. कॅनडातील शिख समुदाय आणि खलिस्तानवाद्यांनी ट्रुडो यांच्या लिबरल पार्टीला पाठिंबा दर्शविला होता.

2018

ट्रुडो या वर्षी प्रथम भारत भेटीवर आले होते. या दौर्‍यात त्यांनी जसपाल अटवाल यांना निमंत्रण दिले होते. 1985 मध्ये कॅनडा दौर्‍यावर गेलेल्या पंजाब मंत्र्याचा हत्येच्या प्रयत्नाच्या कटाचा जसपाल यांच्यावर आरोप आहे. जसपाल यांना गोंजारल्यानंतर दोन्ही देशातील राजनैतिक संबंधात तणाव निर्माण झाला होता.

2020

पंजाबमधील शेतकरी मोर्चाला ट्रुडो यांनी पाठिंबा जाहीर केला. शेतकर्‍यांना त्यांच्या हक्कासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. भारताच्या अंतर्गत प्रश्नाबाबत वक्तव्य केल्याने ट्रुडो यांचा राजनैतिक स्तरावर निषेध करण्यात आला.

18 जून 2020 साली खलिस्तानवादी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याची कॅनडातील गुरुद्वारात हत्या करण्यात आली. 2020 साली निज्जर याला भारताने दहशतवादी घोषित केले होते.

2023

जी-20 या परिषदेसाठी 10 सप्टेंबर 2023 मध्ये ट्रुडो भारत भेटीवर आले होते. या परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडातील भारतीय दुतावासासमोरील खलिस्तानवाद्यांच्या निदर्शनाचा मुद्दा उपस्थित केला होता.

18 सप्टेंबर रोजी ट्रुडो यांनी कॅनडाच्या संसदेत निज्जर हत्येप्रकरणी थेट भारताकडे बोट दाखविले आहे. यानंतर भारताने कॅनडाच्या राजनैतिक अधिकार्‍यांची हकालपट्टी केली. यामुळे दोन्ही देशातील तणाव वाढला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT