कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना आता त्यांच्याच पक्षातून विरोधाचा सामना करावा लागत आहे. (Image source- X)
आंतरराष्ट्रीय

India- Canada row | 'राजीनामा द्या!' कॅनडा PM जस्टिन ट्रुडो यांना त्यांच्या पक्षातूनच विरोध

भारताशी वादादरम्यान जस्टिन ट्रुडो अडचणीत, राजीनाम्यासाठी दिली डेडलाइन

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताशी संबंध ताणले गेल्याच्या पार्श्वभूमीवर (India- Canada row) कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Canada PM Justin Trudeau) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जस्टिन ट्रुडो यांना आता त्यांच्याच पक्षातून विरोधाचा सामना करावा लागत आहे. कारण भारत-कॅनडा वादाच्या दरम्यान, त्यांच्या लिबरल पक्षाच्या खासदारांनी (Liberal lawmakers) पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना चौथ्यांदा निवडणूक न लढवण्याचा सल्ला दिला आहे.

एपी वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, लिबरल पार्टी ऑफ कॅनडाच्या खासदारांनी ट्रुडो यांना त्यांचा निर्णय घेण्यासाठी २८ ऑक्टोबरची डेडलाइन दिली आहे. काही लिबरल खासदारांनी सांगितले की ट्रूडो यांनी “२८ ऑक्टोबरपर्यंत पदावरुन पायउतार व्हायला हवे; अन्यथा अनपेक्षित परिणामांना सामोरे जावे लागू शकते,” असे वृत्तात पुढे म्हटले आहे.

दरम्यान, त्यांच्या पक्षाच्या अनेक सदस्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर बोलताना ट्रूडो म्हणाले की, लिबरल खासदार हे मजबूत आणि एकजूट आहेत. तीन खासदारांनी सांगितले आहे की ते पक्षाच्या एकूण २० पेक्षा जास्त खासदारांपैकी आहेत ज्यांनी ट्रुडो यांना आगामी निवडणुकीपूर्वी पंतप्रधान पदावरुन पायउतार होण्यास सांगणाऱ्या पत्रावर स्वाक्षरी केली आहे.

"ट्रुडो यांनी लोकांचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे"

कॅनडाच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये लिबरल पक्षाच्या खासदारांची संख्या १५३ आहे. "ट्रुडो यांनी लोकांचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे," असे संसदेतील लिबरल खासदार केन मॅकडोनाल्ड यांनी नमूद केले आहे. मॅकडोनाल्ड हे लिबरल पक्षाचे न्यूफाउंडलँडमधील खासदार आहेत. त्यांनी पत्रावर स्वाक्षरी केली आहे. पण हे पत्र सार्वजनिक करण्यात आलेले नाही.

ट्रुडो यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव

पुन्हा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतलेल्या मॅकडोनाल्ड यांनी सांगितले की, आगामी निवडणूक लढवण्याची तयारी करत असलेले त्यांचे अनेक सहकारी मतदानाच्या कमी टक्केवारीमुळे नाराज आहेत. तीन तास चाललेल्या लिबरल खासदारांच्या बैठकीत त्यांचे पत्र ट्रुडो यांना वाचून दाखवण्यात आले. त्यात पंतप्रधानांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा आणि चौथ्यांदा निवडणूक न लढवू नये, यावर जोर दिला. ट्रुडो यांना २८ ऑक्टोबरपर्यंत यावर निर्णय घ्यावा, असे या पत्रात म्हटले आहे.

....पण ट्रूडो यांची चौथ्यांदा निवडणूक लढवण्याची तयारी

ट्रूडो यांनी याआधी, पुन्हा निवडणूक रिंगणात उतारण्याची इच्छा बोलून दाखवली होती. दरम्यान, गेल्या सुमारे १०० वर्षांत एकाही कॅनडाच्या पंतप्रधानाला सलग चार वेळा विजय मिळवता आलेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT