Pudhari
आंतरराष्ट्रीय

US War : सागरी युद्ध भडकले, तांबड्या समुद्रात हुतींचे, तर ओमानच्या आखातात अमेरिकेचे जहाजांवर हल्ले

Strait of Hormuz : शांततेच्या शक्यता धूसर; ‘होर्मुझ’ची सामुद्रधुनी बंदच ठेवण्याचा इराणचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

दुबई/वॉशिंग्टन : पश्चिम आशियातील युद्ध थांबण्याची चिन्हे धूसर होत असतानाच, सागरी वाहतुकीवर नव्याने हल्ले झाल्याची माहिती समोर आली आहे. तांबड्या समुद्राच्या प्रवेशद्वारावर आणि ओमानच्या आखातात हे हल्ले झाले असून, दोन्ही भाग जागतिक तेल पुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानले जातात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे शांतता करार लवकरच होईल असा दावा करत असले, तरी प्रत्यक्ष परिस्थितीत तणाव अधिक वाढला आहे. अमेरिकेने आपल्या अटी मान्य करेपर्यंत ‘होर्मुझ’ची सामुद्रधुनी व्यापारी जहाजांसाठी उघडली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा इराणने दिला आहे.

तांबड्या समुद्राच्या दक्षिणेकडील बाब अल-मंदेब सामुद्रधुनीत हुती बंडखोरांनी केलेल्या संशयित हल्ल्यात एका लहान मालवाहू जहाजावरील चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. याशिवाय, हुतीविरोधी लष्करी दलातील दोन येमेनी बचावकर्तेही मारले गेले आहेत.

‘तिहामाह’ या इजिप्तच्या मालकीच्या जहाजावर झालेला हा हल्ला, युद्ध सुरू झाल्यापासून हुतींनी सागरी वाहतुकीवर केलेल्या हल्ल्यांमधील पहिलीच मोठी प्राणघातक घटना ठरली आहे. हुतींच्या ‘सबा’ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियाला लष्करी सामान वाहून नेणाऱ्या जहाजाला लक्ष्य करण्यात आले.

ओमानच्या आखातात अमेरिकन नौदलाची कारवाई

दुसरीकडे, अमेरिकन सैन्याने ओमानच्या आखातात कारवाई करत एका जहाजावर क्षेपणास्त्रे डागली. पनामाचा ध्वज असलेल्या मालवाहू जहाजाने इराणी बंदरांवर लादलेल्या सागरी नाकेबंदीचे उल्लंघन केले.

वारंवार दिलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याने अमेरिकन नौदलाच्या ‘एमएच-६०’ हेलिकॉप्टरने दोन ‘हेलफायर’ क्षेपणास्त्रे डागून जहाजाची सुकाणू यंत्रणा (स्टिअरिंग गिअर) निकामी केली.

इंधन बाजारात भीतीचे वातावरण; तेल महागले

या नव्या घडामोडींमुळे जागतिक शेअर बाजारात घसरण झाली असून, कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूडचे दर १.४ टक्क्याने वाढून ८८.९१ डॉलर्स प्रतिबॅरलवर पोहोचले, तर अमेरिकन क्रूड १.३ टक्क्याने वाढून ८३.२० डॉलर्सवर बंद झाले. इराणचे सर्वोच्च सुरक्षा अधिकारी मोहसेन रझाई यांनी अमेरिकेने जप्त केलेली संपत्ती मुक्त करावी आणि गाझा, तसेच लेबनॉनमधील संघर्ष थांबवावा, अशा अटी घातल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT