पुढारी ऑनलाईन डेस्क :
ही गोष्ट ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल पण वन्यजीवांची तस्करी रोखण्यात उंदरांची मदत होत आहे, पण हे सत्य आहे. आफ्रिकेत सापडणारा एक विशेष प्रकारचा उंदीर (आफ्रिकन जायंट पाऊच) हा जवळपास आपल्याकडील छोट्या माजंरीएवढा मोठा असतो. पण याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे वास घेण्याची उच्च क्षमता असणारे नाक. या उंदरांच्या वास घेण्याच्या क्षमतेचा उपयोग करून वन्यजीव अवयवांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी जागतीक वन्यजीव संघटना प्रयत्न करत आहे. सीएनएन या वृत्तसंस्थेने यासंदर्भात माहिती दिली आहे.
APOPO ही एनजीओ हे काम करत आहे. या उंदरांना ट्रेनिंग देऊन जहाजांमार्फत तस्करी होणारे वन्यजीव शोधण्यासाठी तयार केले जाते. या उंदरांमुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेकांचे प्राण वाचले आहेत. पेरलेले भूसुरंग शोधण्यात तसेच भूकंपामध्ये ढिगाऱ्याखाली गाडलेल्या अनेकांना शोधण्याचे काम या उंदरानी केले आहे. त्यामुळे या उंदरांना ‘हिरो रॅट’ असे म्हटले जाते.
जगामध्ये दरवर्षी २३ बिलीयन डॉलर्स एवढी उलाढाल बेकायदेशीर वन्यजीव अवयवांच्या तस्करीमध्ये होत असते. यामध्ये हत्तीचे दात, गेंड्याची शिंगे, पँगोलिन स्केल इत्यादी वस्तूंचा समावेश असतो. तसेच तस्कर वन्यजीवांचे अवयव तस्करी करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्ती शोधत असतात. हस्तीदंत किवा प्राण्याची हाडे यांची वेगवेळ्या वस्तूंमध्ये लपवून नेले जातात. ही तस्करी आफ्रिका खंडात मोठ्या प्रमाणत होते. आफ्रिकेमधील कमकूवत तपास यंत्रणा तसेच कुचकामी धोरणे याचा फायदा तस्कर घेत असतात. आफ्रिकेतील बंदरे, विमानतळ याठिकाणाहून ही तस्करी होत असते.
या उंदरांना वन्यजीवांशी संबधित वस्तू जवळपास असल्यास वासाची तीव्र भावना येते. APOPO च्या नेतृत्वाखालील आणि फ्रंटियर्स इन कॉन्झर्व्हेशन सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या नवीन संशोधनानुसार, उंदरांना हत्तीचे दात, गेंड्याची शिंगे, पँगोलिन स्केल शोधण्यासाठी यशस्वीरित्या प्रशिक्षण देण्यात आले आहे. या उंदरांना प्रशिक्षित करणारे डॉ. इझी स्कॉट यांच्या मते अशा वस्तू शोधण्यामध्ये या उंदरांचा खूपच उपयोग होतो. अशा कामांसाठी प्रशिक्षीत असलेल्या कुत्र्यांपेक्षा हे उंदिर अधिक उपयुक्त ठरतात. कारण उंदीर हे लहान आकाराचे आणि चपळ असतात ते जहाजातील कंटेनरमध्ये अशा वन्यजीवांशी संबधित वस्तूंचा सहज शोध घेतात.
तसेच कुंत्र्यापेक्षा आकाराने लहान असल्याने एक प्रशिक्षक अनेक उंदरांना हाताळू शकतो. तसेच त्यांच्या प्रशिक्षणासाठीही अत्यल्प खर्च येतो. उंदरांच्या ट्रेनिंग, आहार, वाहतूक यामध्येही खूप कमी खर्च येतो असेही स्कॉट यांनी सांगितले आहे. या ‘हिरो रॅट’ चा वापर वाढला तर मोठ्या प्रमाणात वन्यजीव अवयव तस्करीवर नियंत्रण मिळू शकते.
हा प्रकल्प राबविणारी संस्था APOPO च्या मते गेल्या वर्षी टांझानियातील दार - ए- सालेम या बंदरावर घेतलेल्या प्रयोगामध्ये या उंदरांनी दिलेल्या टास्कमधील ८३ टक्के पूर्ण केले होते. लपवून ठेवलेले वन्यजीव संबधित वस्तू या उंदरांनी बरोबर शोधून काढल्या होत्या. भविष्यात या ट्रेन केलेल्या उंदराचा अशा कामासाठी वापर वाढून वन्यजीवांशी संबधित वस्तूंच्या तस्करी कमी होऊ शकते अशी आशा या संस्थेने व्यक्त केली आहे.