क्वाड शिखर परिषदेला नरेंद्र मोदी यांच्यासह जपान, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान उपस्थित राहणार File Photo
आंतरराष्ट्रीय

Quad Summit | क्वाड शिखर परिषदेला आज प्रारंभ

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन डी सी : अनिल टाकळकर क्वाडची शिखर परिषद अमेरिकन वेळापत्रकानुसार (शनिवारी) २१ तारखेला डेलावेअरमधील विल्मिंग्टन सुरू होत असून, त्याची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. क्वाड संघटनेत भारत हा नेतृत्व करणारा देश म्हणून अमेरिका पाहत असून, अमेरिकेच्या इंडो पॅसिफिक धोरणाचा तो महत्त्वाचा भागीदार आहे, असे व्हाईट हाऊस नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलच्या इंडो पॅसिफिक क्षेत्रातील वरिष्ठ सल्लागार आणि जो बायडेन यांच्या विशेष सहायक मीरा रॅप - हूपर यांनी फॉरेन प्रेस सेंटरमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. क्वाडची पुढील शिखर परिषद भारतात होईल, यास त्यांनी यावेळी दुजोरा दिला यासंबंधात वॉशिंग्टन डी सीच्या फॉरेन प्रेस सेंटरमध्ये मीरा रॅप-हपर यांनी पत्रकारांशी बातचीत केली, त्यावेळी पुढारी समूहाचे अमेरिकेतील विशेष प्रतिनिधी या नात्याने त्यांना या परिषदेशी निगडित २ प्रश्न विचारले. त्यांनी दिलेल्या उत्तरानुसार यावेळची शिखर परिषद अमेरिकेत घेऊ देण्याची विनंती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्य केली आहे. पुढील वर्षी ही शिखर परिषद भारतात होणार आहे.

  • यजमानपद जो बायडेन यांच्याकडे, पुढील वर्षीची शिखर परिषद भारतात

  • इंडो पॅसिफिकबाबतच्या अमेरिकेच्या धोरणात भारत महत्त्वाचा भागीदार

  • भारताकडे या भागाचे नेतृत्व, अमेरिकेची भूमिका

क्वाडमधील भारताच्या सामरिकदृष्ट्या असलेल्या महत्त्वाकडे अमेरिका कसे पाहते? भारताने या उद्दिष्टाच्या दृष्टीने काय करणे बायडेन प्रशासनाला अपेक्षित आहे? या प्रश्नावर त्या म्हणाल्या, क्वाड संघटनेत भारत एक आघाडीचा नेता आहे, अशी अमेरिकेची धारणा आहे. इंडो पॅसिफिक क्षेत्राबाबत अमेरिकेचे जे धोरण आहे, त्यात भारताला अमेरिकेने महत्त्वाचे स्थान दिले आहे. या क्षेत्राचे नेतृत्व भारताकडे असून, इथे भारत हा अमेरिकेचा वाढत्या प्रमाणात भागीदार होत असून, भविष्यकाळात हीच अपेक्षा आहे.

क्वाडच्या शिखर परिषदेच्या वेळापत्रकातील बदलाच्या प्रश्नावर मीरा रॅप हूपर म्हणाल्या, यंदाची शिखर परिषद भारतात घेण्याचे नियोजन होते. परंतु, चारही नेत्यांच्या वेळापत्रकांचा विचार करता, ते सर्व एकत्र येऊन त्यांच्याशी सखोल चर्चा करण्यासाठी सर्वोत्तम वेळ याच आठवड्याच्या शेवटी अमेरिकेत मिळेल, हे स्पष्ट झाले. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांना ही परिषद अमेरिकेत घेऊ द्यावी, अशी विनंती करण्यात आली. ती त्यांनी उदारपणे मान्यही केली. त्यामुळे पुढील वर्षी भारतात क्वाडचे चारही राष्ट्रप्रमुख भारतात भेटतील, अशी अपेक्षा आहे. त्याचे यजमानपद त्या वर्षी भारताकडे असेल.

इंडो पॅसिफिक क्षेत्र सुरक्षित आणि खुले राहावे, त्याची भरभराट व्हावी, हा क्वाड संघटनेच्या निर्मितीमागचा प्रमुख उद्देश आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना मीरा हूपर म्हणाल्या, या क्षेत्राच्या प्रश्नावर एकत्रित काम करण्यासाठी क्वाड हे एक आदर्श व्यासपीठ ठरले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT