दोहा : इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, कतारचे एक लष्करी हेलिकॉप्टर पर्शियन आखातात कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कतार सरकारने रविवारी (दि. २२) या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत पुष्टी केली. ही दुर्घटना कतारच्या प्रादेशिक जलक्षेत्रात घडली असून, एक व्यक्ती अद्याप बेपत्ता असल्याचे त्यांच्या गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
कतारच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सदर हेलिकॉप्टर नियमित सराव करत होते. त्यादरम्यान हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि समुद्रात कोसळले. मृतांमध्ये केवळ लष्करी जवान होते की सामान्य नागरिकांचाही समावेश होता, याबाबत अद्याप स्पष्टता देण्यात आलेली नाही. सध्या कोस्ट गार्ड आणि अंतर्गत सुरक्षा दल यांच्यामार्फत बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचाव मोहीम राबवली जात आहे.
कतार संरक्षण मंत्रालयाने 'एक्स'वर (ट्विटर) पोस्ट करत म्हटले आहे की, ‘नियमित कर्तव्यावर असताना तांत्रिक बिघाडामुळे कतारी हेलिकॉप्टरला अपघात झाला. चालक दल आणि प्रवाशांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.’
मध्यपूर्वेतील वाढता तणाव आणि इराणकडून कतारमधील अमेरिकन तळांना लक्ष्य केले जाण्याच्या घटनांमुळे या अपघाताबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. इराणच्या हल्ल्यामुळे हा अपघात झाला असावा का, अशी शंका व्यक्त केली जात असली तरी, कतार सरकारने अशा शक्यता फेटाळून लावल्या आहेत. हा निव्वळ तांत्रिक बिघाड असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
दरम्यान, सौदी अरेबिया आणि कतारने अलीकडेच इराणच्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना 'पर्सोना नॉन ग्राटा' (बहिष्कृत राजनैतिक अधिकारी) घोषित केल्यामुळे क्षेत्रीय सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या भीषण दुर्घटनेनंतर कतारच्या लष्कराने आणि सरकारने तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. तांत्रिक बिघाडाचे नेमके कारण शोधण्यासाठी तज्ज्ञांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. या अपघाताचा आखातातील तेल आणि वायू संचलनावर सध्या कोणताही परिणाम झालेला नाही. कतार सरकारने मृतांच्या कुटुंबियांप्रति शोक संवेदना व्यक्त केल्या असून, बचाव कार्य पूर्ण होईपर्यंत यंत्रणा सतर्क राहतील असे सांगितले आहे.