रशियाचे अध्‍यक्ष व्लादिमीर पुतिन.  File Photo
आंतरराष्ट्रीय

जो बायडेन यांनी दिले युक्रेनला 'पाठबळ', रशियाने थेट अणु धोरणातच केला बदल!

सत्ता सोडण्‍यापूर्वी बायडेन यांच्या निर्णयाला रशियाने दिले प्रत्‍युत्तर

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आज (दि.१९) एका महत्त्वपूर्ण निर्णयात सुधारित आण्विक धोरणावर स्वाक्षरी केली आहे, असे वृत्त 'रॉयटर्स'ने दिले आहे. या नव्या धोरणांतर्गत अण्वस्त्रधारी देशाच्या मदतीने रशियावर कोणत्याही देशाने हल्ला केल्यास तो त्या देशावरील संयुक्त हल्ला मानला जाईल. त्या स्थितीत रशिया सरकार अण्वस्त्रांचा वापर करू शकणार आहे. मात्र, या स्थितीत काही अटीही जोडण्यात आल्या आहेत. रशिया-युक्रेन युद्धाला एक हजार दिवस पूर्ण झालेल्‍या दिवशीच पुतिन यांनी हा निर्णय घेतला आहे. रशियाने अमेरिकेच्या या कृतीवर टीका करत हा युद्ध भडकवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

रशियाच्या नव्या अण्वस्त्र धोरणात कोणती तरतूद?

अमेरिकेत जो बायडेन यांच्या सरकारने युक्रेनला रशियावर लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याची परवानगी दिली आहे. रशियाने यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत त्याला चोख प्रत्युत्तर देऊ असे म्हटले आहे. सुधारित आण्विक धोरणावर स्वाक्षरी करण्याचे पुतिन यांचे पाऊल देखील बिडेन यांच्या निर्णयाला दिलेले प्रतिसाद मानले जात आहे. रशियावर मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ला झाल्यास रशिया प्रत्युत्तरात अण्वस्त्रांचा वापर करू शकतो, अशी तरतूद रशियाच्या नव्या अण्वस्त्र धोरणात आहे.

सत्ता सोडताना जो बायडेन यांचा मोठा निर्णय

अमेरिकेच्‍या लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे याआधीही युक्रेनियन लष्कराकडून वापरली जात होती, परंतु हा वापर केवळ सीमावर्ती भागांपुरताच मर्यादित होता. आता सत्ता सोडल्यानंतर जो बायडेन यांनी मोठा निर्णय घेत युक्रेनला रशियाच्या आतही लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याची परवानगी दिली आहे. या मान्यतेमुळे रशियाचे लष्करी तळ, लष्करी आस्थापना आणि इतर महत्त्वाची ठिकाणे युक्रेनच्या निशाण्याखाली आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे रशिया-युक्रेन युद्धाचे संपूर्ण चित्र बदलू शकते.

अमेरिकेच्‍या निर्णयानंतर रशियाच्या अण्वस्त्र धोरणात बदल

रशियाच्या पूर्वीच्या अण्वस्त्र धोरणांतर्गत रशिया किंवा त्याच्या मित्र राष्ट्रांवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हल्ला झाल्याची विश्वसनीय माहिती मिळाल्यानंतरच रशिया अण्वस्त्रांचा वापर करू शकत होता; परंतु आता नव्या धोरणानुसार बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांबरोबरच क्रूझ क्षेपणास्त्रे, मोठ्या प्रमाणावर अण्वस्त्रांचा वापर केला जाऊ शकतो. ड्रोन हल्ला किंवा इतर उडत्या वाहनांद्वारे हल्ला झाल्यास देखील मान्यता देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे जुन्या धोरणात रशियाचा मित्र देश बेलारूसवर हल्ला झाल्यासही रशियाने अण्वस्त्रांचा वापर करण्याची तरतूद होती, मात्र सुधारित धोरणात ही तरतूद काढून टाकण्यात आली आहे.

"रशियाने नेहमीच अण्वस्त्रांना प्रतिबंधाचे साधन म्हणून पाहिले आहे"

रशियातील प्रमुख वृत्तसंस्‍था TASSला दिलेल्‍या माहितीत रशियातील अधिकार्‍यांनी सांगितले की, रशियाला लक्ष्‍य करण्‍यासाठी अमेरिकेने क्षेपणास्‍त्र पुरवली आहेत. आता आम्‍ही अणु धोरणात केलेले बदल हे अधिक व्यावहारिक आहेत. आमचे सैन्य परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. रशियाने नेहमीच अण्वस्त्रांना प्रतिबंधाचे साधन म्हणून पाहिले आहे, एक अत्यंत उपाय," केवळ अत्यंत गंभीर परिस्थितीसाठी याचा वापर करण्‍याचे आमचे धोरण आहे. दरम्‍यान, युक्रेनला लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या वापराच्या कोणत्याही पाश्चात्य समर्थनाचा अर्थ थेट युद्धात सहभाग, असा मानला जाईल, असा इशारा सप्‍टेंबर २०२४ मध्‍येच पुतिन यांनी दिला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT