पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील तीन वर्षांपासून सुरु असणारे रशिया- युक्रेन युद्ध संपवण्यासाठी अनेक देश प्रयत्न करत आहेत. दरम्यान, रशियाकडून एक मोठे विधान समोर आले आहे. क्रेसौदी अरेबियातील चर्चेमुळे पुतिन-ट्रम्प भेटीबाबत स्पष्टता येऊ शकते. गरज पडल्यास रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन हे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करण्यास तयार असल्याचे क्रेमलिनने( रशियन राष्ट्राध्यक्षांचे कार्यस्थळ) म्हटले आहे.
क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी आज (दि.१८) सांगितले की, सौदी अरेबियामध्ये रशिया-अमेरिका चर्चा व्लादिमीर पुतिन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील संभाव्य बैठकीबद्दल अधिक स्पष्टता प्रदान करू शकते; परंतु या प्रश्नावर अद्याप एकमत झालेले नाही. युद्ध संपुष्टात आणण्यासाठीच्या कराराच्या उद्देशाने आज सौदी अरेबियामध्ये रशिया आणि अमेरिकेमध्ये उच्चस्तरीय बैठक होत असताना ही घोषणा करण्यात आली आहे.
रशिया-युक्रेन युद्धबंदीसाठी सौदी अरेबियाची राजधानी रियाध हे एक महत्त्वाचे ठिकाण बनण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि त्यांचे रशियन समकक्ष सर्गेई लावरोव्ह हे आज रियाधमध्ये या प्रश्नी चर्चा करणार आहेत. अमेरिका आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री एकत्र बसून शांतता चर्चेची रूपरेषा तयार करतील. या बैठकीत युक्रेन युद्ध संपवण्याचे आणि अमेरिका-रशिया संबंधांमधील अडथळे दूर करण्याबाबत चर्चा होणार आहे. दरम्यान, या बैठकीत युक्रेनच्या राजदूतांना स्थान देण्यात आलेले नाही. दरम्यान, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनीही आमच्या गैरहजरीत झालेल्या करारांना मान्यता देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
२४ फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिकेने रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. दोन्ही देशांमधील सामान्य संबंधही संपुष्टात आले. १२ फेब्रुवारी रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी दीड तास दूरध्वनीवरून चर्चा करून संबंध सामान्य करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
दरम्यान, युरोपीय राष्ट्रे आणि नाटो सहयोगी देशही वॉशिंग्टनच्या मॉस्कोबद्दलच्या धोरणात अचानक बदल झाल्यामुळे चिंतेत आहेत. तथापि, रियाधमधील बैठकीत डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन वॉशिंग्टन आणि मॉस्कोमधील दरी कमी करण्यासाठी संयुक्त शिखर परिषद आयोजित करू शकतात का हे देखील पाहिले जाईल.