इस्लामाबाद; वृत्तसंस्था : माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या कारावासाला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निषेधार्थ ‘पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ’ (पीटीआय) पक्षाने राजधानी इस्लामाबादकडे भव्य ‘लाँग मार्च’ काढण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या लष्करी शहर रावळपिंडीच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. येथे पुढील सहा महिन्यांसाठी लष्कराच्या तीन कंपन्या तैनात करण्याचे आदेश गृह मंत्रालयाने दिले आहेत.
पंजाब प्रांतीय सरकारच्या मागणीवरून ही कारवाई केल्याचे अधिकृतरीत्या सांगितले जात असले, तरी पीटीआय पक्षाच्या वाढत्या विरोधामुळे शाहबाज शरीफ सरकार धास्तावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. इम्रान खान यांच्या कारावासाला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निषेधार्थ पीटीआयने देशभरात ‘काळा दिवस’ पाळला. त्यानंतर २७ सप्टेंबर रोजी रावळपिंडीचे जुळे शहर असलेल्या राजधानी इस्लामाबादकडे भव्य ‘लॉंग मार्च’ काढण्याचा इशारा दिला आहे. खैबर पख्तुनख्वाचे मंत्री शफी जान यांनी मित्रपक्षांशी चर्चा करून हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. कलम २४५ नुसार नागरी प्रशासनाच्या मदतीसाठी सैन्य तैनात करता येते.
पीटीआयच्या प्रमुख मागण्या
* इम्रान खान आणि पत्नीची तुरुंगातून तत्काळ सुटका
* देशात घटनात्मक राजवट व लोकशाहीची पुनर्स्थापना
* महागाईवर नियंत्रण आणि जनतेच्या जनादेशाचा आदर
* इम्रान यांच्या उपचारांसंबंधी न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी