Pakistan Occupied Kashmir Protests |पाकव्याप्त काश्मीरवासीयांचा एल्गार 
आंतरराष्ट्रीय

Pakistan Occupied Kashmir Protests |पाकव्याप्त काश्मीरवासीयांचा एल्गार

स्वातंत्र्याची मागणी : शाहबाज सरकारविरोधात विशाल आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : पाकव्याप्त काश्मिरात (पीओके) स्वातंत्र्याची मागणी जोर धरू लागली असून, शनिवारी आंदोलकांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ, लष्करप्रमुख असीम मुनीर, व्याप्त काश्मीरचे पंतप्रधान फैसल मुमताज राठोड आणि राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांना थेट दहशतवादी घोषित केले. दरम्यान, या आंदोलनात गेल्या मंगळवारपासून आतापर्यंत ५३ जणांचा बळी गेला आहे.

पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांना इशारा देताना जॉईंट अवामी अ‍ॅक्शन कमिटीच्या नेत्यांनी इशारा दिला की, हे सिंध, बलुचिस्तान किंवा डी चौक नाही तर हे काश्मीर आहे. या ठिकाणी एक मृतदेह दिसला तर लाखो लोक रस्त्यावर उतरतात. पाकिस्तान सरकार या आंदोलनामुळे दडपणाखाली आले आहे. गेल्या मंगळवारपासून पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात ५३ जणांनी जीव गमावला आहे. रावळकोट येथे आंदोलक क्रूर पाकिस्तानी सरकार आणि सैन्याविरुद्ध ठोस भूमिका घेत आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. पाकिस्तान सरकारने लष्कराला हाताशी धरून हे आंदोलन मोडून काढण्यासाठी दडपशाही सुरू केल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

आंदोलक दोन मागण्यांवर ठाम

आंदोलक दोन प्रमुख मागण्यांवर अडून आहेत. पाकिस्तानमधील १२ निर्वासित राखीव रद्द करा आणि पीओकेच्या निवडून आलेल्या नेत्यांची पदाची शपथ, जी पाकिस्तानप्रती निष्ठेऐवजी जम्मू आणि काश्मीरच्या एकतेप्रती निष्ठेची असावी या जनतेच्या मुख्य मागण्या आहेत. जनतेच्या मते पीओके हा पाकिस्तानचा भाग नाही.

पाकिस्तानी सैन्य आणि सरकारविरुद्ध बंड

पाकिस्तानी सैन्य आणि सरकारविरुद्धच्या बंडात सरदार अमन खान आणि ख्वाजा मेहरान यांनी पीओकेच्या स्वातंत्र्याची उघडपणे मागणी करून पाकिस्तानी सैन्याविरुद्ध निर्णायक युद्धाची घोषणा केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT