पुढारी ऑनलाईन डेस्क : वाढीव आयात शुल्क लागू करत जगभरातील देशांना वेठीस धरणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump) यांच्या कारभाराविरुद्ध देशवासीय नाराजी व्यक्त करु लागले आहे. त्याचबरोबर त्यांचे सल्लागार आणि जगातील श्रीमंत उद्योजक एलान मस्क (Elon Musk) यांच्या धोरणांवरही जनमत भडकू लागले आहे. शनिवारी (दि. ५) ट्रम्प सरकारच्या धोरणांविरुद्ध मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले. ट्रम्प आणि मस्क यांच्यापासून अमेरिकेतील लोकशाही धोक्यात आली आहे, असा आरोप यावेळी निदर्शकांनी केला. ( 'Hands Off' rally in across US )
वाढलेले टॅरिफ (आयात शुल्क), सरकारी कर्मचार्यांची कपात, अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती आणि मानवी हक्कांसह अनेक मुद्द्यांवर निषेध व्यक्त करण्यासाठी शनिवारी अमेरिकेतील विविध शहरांमध्ये हजारो अमेरिकन नागरिकांनी ट्रम्प प्रशासनाविरुद्ध मोर्चे काढले. निदर्शकांनी वॉशिंग्टन, न्यू यॉर्क, ह्युस्टन, फ्लोरिडा, कोलोरॅडो आणि लॉस एंजेलिससह इतर शहरांमध्ये सरकारी धोरणांचा तीव्र निषेध केला. सरकारचे धोरणांमुळे अमेरिका जगभरातील मित्र गमावत आहे. आपल्या देशातल्या लोकांवर संकटात टाकत आहे, असा दावा निदर्शकांनी केला.
ट्रम्प सरकारच्या धोरणांविरुद्ध शनिवारी संपूर्ण अमेरिकेत १००० हून अधिक निदर्शने करण्यात आली. या आंदोलनास 'हँड्स ऑफ' असे नाव देण्यात आले. नागरी हक्क संघटना, कामगार संघटना, LGBTQ+ वकिल आणि निवडणूक कामगारांसह १५० हून अधिक गटांनी या निषेधात भाग घेतला. अमेरिकेतील मिडटाउन मॅनहॅटनपासून अँकरेज, अलास्का पर्यंतच्या शेकडो शहरांमध्ये हजारो निदर्शकांनी ट्रम्प आणि एलोन मस्क यांच्या टाळेबंदी, अर्थव्यवस्था, स्थलांतर आणि मानवी हक्कांवरील धोरणांचा निषेध केला. सामान्य लोकांच्या 'हँड्स ऑफ' रॅलीमुळे ट्रम्प प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आहेत.
पोर्टलँड, ओरेगॉन आणि लॉस एंजेलिसमध्ये शेकडो निदर्शक रस्त्यावर उतरले, त्यांनी पर्शिंग स्क्वेअर ते सिटी हॉलपर्यंत मोर्चा काढला आणि सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली. डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यापासून, एलोन मस्क यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकन सरकारचा कार्यक्षमता विभाग कर्मचाऱ्यांची कपात करण्यात गुंतला आहे. कामगार कपात, सामाजिक सुरक्षा प्रशासनाची प्रादेशिक कार्यालये बंद करणे, स्थलांतरितांची हद्दपारी, ट्रान्सजेंडर लोकांचे संरक्षण आणि आरोग्य कार्यक्रमांच्या निधीत कपात याविरोधात लोक संताप व्यक्त करत आहेत.
निदर्शनांवर व्हाईट हाऊसने म्हटले आहे की, "राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भूमिका स्पष्ट आहे. पात्र लाभार्थ्यांपर्यंत सामाजिक सुरक्षा, वैद्यकीय सुविधा देण्याच्या बाजूने ते नेहमी आहेत. डेमोक्रॅट्सचा दृष्टिकोन बेकायदेशीर परदेशी नागरिकांना सामाजिक सुरक्षा, मेडिकेड आणि मेडिकेअर फायदे देण्याचा आहे. यामुळे हे कार्यक्रम दिवाळखोरीत निघतील आणि अमेरिकन ज्येष्ठ नागरिकांना त्याचे परिणाम भोगावे लागतील."