लंडन; वृत्तसंस्था : लंडनमध्ये एक लाखांहून अधिक लोकांनी भव्य निषेध मोर्चा काढला. ‘युनाईट द किंगडम’ असे नाव असलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व स्थलांतरविरोधी नेते टॉमी रॉबिन्सन यांनी केले. याला ब्रिटनमधील आतापर्यंतची सर्वात मोठी उजव्या विचारसरणीची रॅली मानले जात आहे.
ब्रिटनमधील बेकायदेशीर स्थलांतराच्या विरोधात आवाज उठवणे हा या आंदोलनाचा मुख्य उद्देश होता. बेकायदेशीर स्थलांतरितांना देशाबाहेर काढण्यात यावे, अशी आंदोलकांची मागणी होती. या वर्षी 28 हजारांहून अधिक स्थलांतरित इंग्लिश चॅनलमार्गे बोटींमधून ब्रिटनमध्ये दाखल झाले आहेत. या आंदोलनात टेस्लाचे मालक एलॉन मस्क व्हिडीओद्वारे सहभागी झाले. ‘द इंडिपेंडंट’ या माध्यम वाहिनीनुसार, त्यांनी टॉमी रॉबिन्सन यांच्याशी संवाद साधला. मस्क म्हणाले, ‘हिंसा तुमच्या दारात येत आहे. एक तर लढा किंवा मरा.’ मस्क यांनी ब्रिटनची संसद बरखास्त करण्याची मागणी केली. सरकार बदलावेच लागेल, असेही ते म्हणाले.