सेंट पीटर्सबर्ग; वृत्तसंस्था : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भारताला अत्याधुनिक पाचव्या पिढीचे (फिफ्थ जनरेशन) सुखोई एसयू-57 स्टेल्थ लढाऊ विमान विकसित आणि उत्पादन करण्यासाठी संयुक्त भागीदारीची ऑफर दिली आहे. यासोबतच आवश्यक संरक्षण तंत्रज्ञान भारतासोबत सामायिक करण्याचीही तयारी रशियाने दर्शविली आहे. सेंट पीटर्सबर्ग आंतरराष्ट्रीय आर्थिक मंच कार्यक्रमादरम्यान आंतरराष्ट्रीय माध्यमांशी संवाद साधताना पुतीन यांनी ही भूमिका मांडली.
दरम्यान, यापूर्वीही भारताला या प्रकल्पात सहभागी होण्याची ऑफर देण्यात आली होती. मात्र, त्यावेळी भारताने रशियाला प्रकल्प पुढे नेण्यास सांगितले होते आणि नंतर सहभागाबाबत विचार करण्याची भूमिका घेतली होती. पुतीन म्हणाले की, ‘हे विमान संयुक्त प्रकल्प ठरू शकले असते. आम्ही ते स्वतः विकसित केले आहे; मात्र आजही भारतासोबत या क्षेत्रात सहकार्य करण्यास तयार आहोत. भारताला हे विमान देणे आणि त्याच्या पुढील विकासात भागीदारी करणे याबाबत आम्हाला कोणतीही अडचण नाही.’
जगातील अत्याधुनिक पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानांमध्ये अमेरिकेचे लॉकहीड मार्टिन एफ-35 लायटनिंग २, चीनचे शेनयांग जे-35 आणि रशियाच्या एसयू-57 यांचा समावेश होतो. भारत-पाकिस्तान संबंधांवर भाष्य करताना पुतीन म्हणाले की, दोन्ही देशांतील गुंतागुंतीचे प्रश्न रशियाला माहीत आहेत. मात्र, त्यांनी या विषयावर अधिक भाष्य टाळले. पाकिस्तान हा स्वतंत्र आणि मोठा देश असून, त्याचे विविध देशांशी संबंध आहेत. चीनसोबतचे त्याचे सहकार्य महत्त्वाचे असले, तरी पाकिस्तान पूर्णपणे चीनच्या प्रभावाखाली आहे, असे म्हणता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
भारतावर दबाव टाकणे व्यर्थ; पुतीन यांचा अमेरिकेला टोला
भारताचे अमेरिकेसोबत वाढते संबंध रशियासाठी चिंतेचा किंवा तणावाचा विषय नसल्याचे पुतीन यांनी स्पष्ट केले. एका पत्रकाराने ‘भारताचे अमेरिकेसोबतचे संबंध रशियासोबत तणाव निर्माण करत आहेत का,’ असा प्रश्न विचारला. यावर पुतीन म्हणाले की, हा विचार अत्यंत विचित्र आहे. भारत हा एक महान देश आहे. भारत आमचा विश्वासू आणि खात्रीलायक भागीदार आहे. भारताचे जगातील सर्वच देशांशी चांगले संबंध विकसित होत असल्याचा रशियाला आनंदच आहे. काही मुद्द्यांवर अमेरिका भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, अशा प्रयत्नांना यश मिळणार नाही. भारत त्याला विरोध करेल. जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारतावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर दबाव आणणे अशक्य आहे, हे आता सर्वांना समजले आहे. भारताच्या वेगवान आर्थिक वाढीचे कौतुक करत, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार लवकरच १०० अब्ज डॉलर्सचा टप्पा पार करेल, असा विश्वास पुतीन यांनी व्यक्त केला.
सर्वोत्तम लढाऊ विमानांपैकी एक
पुतीन यांनी ‘एसयू-57’चे वर्णन जगातील सर्वोत्तम लढाऊ विमानांपैकी एक असे केले. हे विमान स्टेल्थ तंत्रज्ञान, उच्च गतिमानता, आधुनिक एव्हिऑनिक्स प्रणाली आणि बहुउद्देशीय युद्धक्षमता यांसाठी ओळखले जाते. हवाई, स्थल आणि सागरी लक्ष्यांवर अचूक हल्ले करण्याची क्षमता त्यात आहे.
भारत-चीन संबंधांत हस्तक्षेप नाही
भारत-चीन संबंधांबाबत बोलताना पुतीन यांनी रशिया कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी भारत आणि चीनमधील सीमा व अन्य प्रश्न संवादातून सुटू शकतात, असा विश्वास व्यक्त केला. तसेच, रशियाचे भारत आणि चीन या दोन्ही देशांशी स्वतंत्र व मजबूत संबंध असल्याचेही त्यांनी नमूद केले.