महादेव बेटिंग ॲप प्रकरणी या ॲपचा प्रमोटर सौरभ चंद्राकर याला दुबईत अटक करण्यात आली आहे. (File photo)
आंतरराष्ट्रीय

मोठी कारवाई! महादेव बेटिंग ॲपचा मालक सौरभ चंद्राकर याला दुबईत अटक

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : महादेव बेटिंग ॲप (Mahadev betting app case) प्रकरणी या ॲपचा प्रमोटर सौरभ चंद्राकर याला दुबईत अटक करण्यात आली आहे. सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) विनंतीवरून जारी केलेल्या इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटीसच्या आधारे ही अटक करण्यात आली. ईडीसह परराष्ट्र मंत्रालय (MEA) आणि गृह मंत्रालय (MHA) यांच्या समन्वयाने ही कारवाई पार पडली.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, यूएई अधिकाऱ्यांनी काल परराष्ट्र मंत्रालयाशी (MEA) अधिकृतपणे संवाद साधून सौरभ चंद्राकर याला दुबईत अटक केल्याची माहिती दिली. ईडी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्यार्पण प्रक्रिया पुढील काही दिवसांत पूर्ण होईल आणि त्याला भारतात प्रत्यार्पण करण्यासाठी यूएई प्राधिकरणाकडे विनंती केली आहे.

Mahadev betting app case : रवी उप्पलही अटकेत

महादेव बेटिंग ॲपच्या मुख्य प्रमोटरपैकी एक असलेल्या सौरभ चंद्राकरला मनी लाँड्रिंग आणि फसवणूक प्रकरणात इंटरपोलने जारी केलेल्या अटक वॉरंटच्या आधारे दुबईत करण्यात आली आहे. आता लवकरच त्याला भारतात आणले जाण्याची शक्यता आहे. या ॲपचा आणखी एक प्रमोटर रवी उप्पल याला गेल्या वर्षीच्या अखेरीस दुबईत अटक करण्यात आली होती. त्यांच्याविरुद्ध रेड नोटीस जारी करण्याची विनंती ईडीने केली होती. त्यानंतर त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या.

Mahadev betting app case : काय आहे महादेव बेटिंग घोटाळा?

महादेव ऑनलाइन बेटिंग घोटाळा हा छत्तीसगडमधील भिलाई येथील व्यक्तींचा समावेश असलेल्या आणि यूएई तसेच भारतातील विविध राज्यांमधून चालवल्या जाणाऱ्या बेकायदेशीर कारवायांचे एक जाळे आहे. २०२३ मध्ये छत्तीसगडमधील अनेक छामेमारीच्या कारवाईदरम्यान ईडीने या घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. ईडीच्या माहितीनुसार, महादेव ऑनलाइन बेटिंग ॲप हा एक अनधिकृत प्लॅटफॉर्म होता. ज्या माध्यमातून क्रिकेट आणि फुटबॉलसह विविध खेळांवर तसेच जुगाराच्या इतर प्रकारांवर बेकायदेशीर बेटिंगचा व्यवहार चालत होता. संपूर्ण भारतामध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या या ॲपने झटपट पैसे कमविण्याचे आमिष दाखवून अनेकांना आकर्षिक केले होते.

सौरभने लग्नात उधळले होते २०० कोटी

सौरभचे यूएईतील रास अल खैमाह येथे फेब्रुवारी २०२३ मध्ये लग्न झाले होते. त्याने त्याच्या लग्नात सुमारे २०० कोटी रुपये रोख खर्च केला होता. त्याने भारतातून नातेवाईकांना लग्न सोहळ्याला आणण्यासाठी खासगी जेट भाड्याने घेतले होते. तसेच लग्नात परफॉर्म करण्यासाठी त्याने सेलिब्रिटींसाठी मोठी रक्कम मोजली दिली होती, असा ईडीचा आरोप आहे. महादेव बेटिंग ॲप घोटाळा हा सुमारे ६ हजार कोटींचा आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT